Sunday, September 14, 2025

Swine Flu : स्वाईन फ्लूचा पुन्हा शिरकाव! नाशिककरांची चिंता वाढली

Swine Flu : स्वाईन फ्लूचा पुन्हा शिरकाव! नाशिककरांची चिंता वाढली

दोघांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

नाशिक : गेल्या दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या स्वाईन फ्लयूचा धोका पुन्हा समोर येण्याची भीती वाढत आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव झाला आहे. नाशिकमधील मालेगावात स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये संपूर्णत: खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिक मालेगावातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे. ५ एप्रिल रोजी मालेगावातील ६३ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूने ग्रासले होते. त्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मालेगावमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. गेल्या २० दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. यामुळे मालेगाव महापालिका प्रशासनाचे आरोग्य विभाग पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले आहे.

दरम्यान, मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तींचा तसेच परिसरातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन मालेगाव महापालिकेकडून करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाचे आवाहन

सर्दी, खोकला, ताप व चालताना दम लागणे ही लक्षणे दिसत असल्यास तातडीने जवळचे महापालिका रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा आपला दवाखाना येथे तपासणी करून घ्यावी. औषधोपचार सुरू करावेत. घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा सूचना महापालिका आरोग्य विभागाने केल्या आहेत. मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री अहिरे यांनी पालिकेकडून उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती दिली. स्वाइन फ्लू बरा होतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

Comments
Add Comment