Sunday, September 14, 2025

Heat Stroke : मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी!

Heat Stroke : मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी!

बिडकीन : मराठवाड्यात उष्माघाताने (Heat Stroke) पहिला बळी घेतला आहे. मृत मुलगा ३० वर्षीय आहे. जैनपूर मध्ये फिरायला गेला असताना त्याला अचानक चक्कर आली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

गणेश कुलकर्णी हा ३० वर्षीय मुलगा मित्र आणि नातेवाईकांसोबत संध्याकाळी चारच्या सुमारास फिरायला गेला होता. यावेळी तो अचानक चक्कर येऊन पडला. त्याच्या नाका-तोंडून फेस येऊन तो जागीच मृत पावला. तातडीने त्याला बिडकीन मध्ये ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. गणेशच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपावण्यात आला होता. काल रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश हा एका खाजगी कंपनीत मजूर म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि १४ महिन्याचा मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. त्याच्या निधनाच्या वृत्तानंतर आजूबाजुच्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

होळी होताच राज्यात उन्हाचा पारा तीव्र झाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच सूर्य आग ओकत असल्याने दुपारी उन्हात बाहेर पडणे अनेकांना कठीण झाले आहे.

गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, तर शवविच्छेदन अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत खात्रीशीर माहिती मिळेल, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी प्रणिता मात्रे यांनी दिली आहे.

सध्या उन्हाचा वाढता कडाका पाहता दुपारच्या वेळेस अत्यावश्यक नसल्यास उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी देखील बरसत आहेत. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment