Thursday, September 18, 2025

काव्यरंग

काव्यरंग

पतंग आभाळी उडेल आता..!!

बोचरी थंडी सरेल आता वारा झूळझूळ सुटेल आता शेपट्या लावून रंगबिरंगी पतंग आभाळी उडेल आता मैदानी या गजबज होऊन सवंगडी हे जमतील आता कच्चा पक्का मांजा ओढून काटम काटी चालेल आता पतंग माझा पतंग त्याचा अलग ढाचा ज्याचा त्याचा हरणाराही जिंकणारासह निखळ आनंद लुटेल आता हिरवा, निळा, लाल, पिवळा रंग आभाळा चढेल आता वेळ मुलांचा मजेत जाईल अवघे आभाळ कवेत घेता पतंग आभाळी उडेल आता झिंग वेगळी चढेल आता दहा हत्तीचे बळ संचारून भूक मुलांची हरेल आता - भानुदास धोत्रे, परभणी

वासुदेव

प्रसन्न होते पहाट सूर्य किरणे अंबरात भूपाळीच्या मधुर सुरात वासुदेव उभा दारात... किणकिण घंटी नाद मंजुळ घुंगरांची साथ पहाटेच्या ओवी संगे वासुदेव उभा दारात... डोईवर मोरपंखी टोप गळ्यात कवड्यांची माळ शुभ्र पेहरावात सजून वासुदेव उभा दारात... कधी छेडतो सुंदर ताण कधी सांगतो भविष्य छान झोळी भरण्या दारिद्र्याची वासुदेव उभा दारात... - हिरकणी राजश्री बोहरा, डोंबिवली - ठाणे

पूर्वेचा सूर्य!

छता-छतांवर आगाज झाला, “टप-टप” दवबिंदूंनी आवाज दिला... रात्रीच्या पहाऱ्याचा वेळ संपला, चांदण्या पहुडल्या विश्रांतीला... पहाटेचा मंद, शीतल, ऊर्जित वारा, पहिल्या प्रहरी प्रकाश मोहरला... सृष्टीने ताजा नवा श्वास भरला, वेली फुलांना सुगंधत केला... क्षितिज केशरी रसाळ झाला तत्पर दिवाकराच्या आगमनाला... आकाशाची कमान स्वागताला निसर्गाने कॅनव्हासमध्ये रंग भरला... सोनेरी दागिने परिधान करण्या शहरात टॉवर्सने माना उंचावल्या... पूर्वेच्या क्षितिजी उदयी आला प्रभाकराने सोनेरी प्रकाश उधळला... उगवत्या सूर्याची लाली अखिल सृष्टी कार्यरत झाली... नमन विश्वाच्या अविष्काराला पूर्वेच्या क्षितिजी उदयी आला.. प्रभाकराने सोनेरी... प्रकाश उधळला... प्रभाकराने सोनेरी... प्रकाश उधळला... - विनायक आजगणकर, परळ
Comments
Add Comment