Thursday, September 18, 2025

अभिनयाचा सूर लागू दे

अभिनयाचा सूर लागू दे

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत, मराठी मालिकेमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लक्षवेधी अभिनेत्री म्हणजे रीना मधुकर होय. ‘सूर लागू दे’ या चित्रपटात तिची महत्त्वपूर्ण अशी भूमिका आहे.

रीना पुण्याची, तिचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड म्हणजे आत्ताची डेक्कन एज्युकेशन सोसायटीत झाले. तिचे कॉलेज (एस. पी. कॉलेज) देखील टिळक रोड वरच होते. तिचे वास्तव्य सदाशिव पेठेत होते. शाळेत तिने सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता. स्नेहसंमेलनात नृत्य बसवायचे कामदेखील तिने केले होते. राजस्थानी लोकनृत्य ती शिकली होती. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक स्पर्धेत तिने भाग घेतला होता. तिची डान्स कंपनी होती, त्यामार्फत ती वेगवेगळे डान्स शो बसवायची. अगदी परदेशात देखील तिने डान्स शो केले. त्यानंतर तिने एक वर्ष जेट एअरवेजमध्ये केबिन क्रूची नोकरी केली. या नोकरीनिमित्त ती मुंबईमध्ये शिफ्ट झाली.

२०११ साली ती मिस्टासाठी लंडनला गेली होती. तिथे तिची ओळख कलादिग्दर्शक नितीन देसाईंशी झाली होती. त्यांनी तिची चौकशी केली व तिला डान्स येतोय हे माहीत झाल्यावर तिला ‘अजंठा’ चित्रपटातील सेकंड हिरोईनची ऑफर दिली. त्यासाठी तिच्या डान्सची ऑडिशन्स नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांनी घेतली. अशा प्रकारे ‘अजंठा’ चित्रपट तिला मिळाला, हा तिच्या अभिनय क्षेत्रातील टर्निंग पॉइंट ठरला. बालगंधर्व चित्रपट पाहताना तिने आईला सांगितले होते की, तिला कलादिग्दर्शक नितीन देसाईंसोबत काम करण्याची इच्छा आहे. तिची ही इच्छा ईश्वराच्या कृपेने लगेच त्यांच्या पुढच्या चित्रपटात म्हणजे ‘अजंठा’मध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. कलादिग्दर्शक नितीन देसाईंकडून संवाद कसे बोलायचे, अभिनय कसा करायचा, या गोष्टी ती शिकली. त्यांची कामाच्या प्रती असणारी पॅशन तिला अजूनपर्यंत तरी इतर कोणामध्ये आढळून आली नाही.

त्यानंतर तिने अँड टिव्हीवर ‘एजंट राघव’ ही हिंदी मालिका केली. अभिनेता शरद केळकर हा एजंट राघवच्या भूमिकेत होता. ‘बेहन होगी तेरी’ हा चित्रपट तिने अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री श्रुती हसनसोबत केला. त्यामध्ये तिने श्रुती हसनच्या बहिणीची भूमिका केली होती. नंतर तिने अभिनेता आमिर खानसोबत ‘तलाश’ चित्रपट केला. अभिनेता आमिर खानसोबत लेडी कॉन्स्टेबलची भूमिका तिने साकारली होती. त्यानंतर ‘३१ दिवस’ हा मराठी चित्रपट तिने केला. त्यामध्ये एका शाळेच्या आंधळ्या मुख्याध्यापिकेची भूमिका तिने केली होती. ‘बेहन होगी तेरी’ या चित्रपटाच्या प्रोडक्शनचा एक मराठी चित्रपट येणार होता, त्यासाठी त्यांनी तेव्हाच तिला साईन केले होते व चित्रपटाचे नाव होते ‘सूर लागू दे’.

‘सूर लागू दे ’या चित्रपटातील भूमिकेविषयी विचारले असता ती म्हणाली की, सोनिया हे माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. आजी-आजोबांना मदत करण्याचा ती प्रयत्न करते. गोड व्यक्तिमत्त्व असणारी ती व्यक्तिरेखा आहे.आम्ही सगळे चाळीत राहणारे दाखविले आहेत. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेजी यांच्याकडून भरपूर शिकायला मिळाल्याचे ती मान्य करते. चित्रपटाच्या शेवटचा विक्रमजींचा मोनोलॉग वनटेकमध्ये त्यांनी चित्रित केला. या गोष्टीचे तिला आज देखील त्यांचं कौतुक वाटतं. दुसऱ्या शेड्युलच्या वेळी विक्रमजींची तब्येत बरी नव्हती, तरी देखील शो मस्ट गो ऑन म्हणण्यानुसार त्यांनी सीन हसतमुख केले. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळ्येकडून वेशभूषा ते अभिनय या साऱ्या बाबतीत शिकायला मिळाल्याचे ती मान्य करते. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्याने चित्रपट चांगलाच तयार झाला आहे. या चित्रपटात तीन गाणी आहेत जी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.

झी टीव्हीवरील ‘मन उडू उडू जाय’ ही तिची मालिका खूप गाजली. त्या मालिकेमध्ये ३ बहिणी दाखविल्या होत्या, त्यात मधल्या बहिणीची तिची भूमिका होती. सानिका हे त्या व्यक्तिरेखेचे नाव होते. या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. तिला खूप लोकप्रियता लाभली. ‘सूर लागू दे’ या तिच्या चित्रपटाला चांगले यश लाभेल, अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.

Comments
Add Comment