
पुणे: विश्वचषक स्पर्धा २०२३मध्ये(world cup 2023) आज भारतीय संघ विजयी चौकार लगावण्यासाठी पुण्याच्या मैदानात उतरणार आहे. हा सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे. पुण्यात हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.
या विश्वचषकात आतापर्यंत दोन धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. सोबतच भारताविरुद्ध गेल्या चार सामन्यात बांगलादेशचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ या सामन्यात कोणतीच जोखीम उचलणार नाही.
गेल्याच सामन्यात बांगलादेशने भारताला हरवले होते
बांगलादेशने गेल्या चार वनडेपैकी तीन सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला आहे. यातील ताजा सामना म्हणजे आशिया चषकातील. यात बांगलादेशने भारतीय संघाला सहा धावांनी हरवले होते. इंग्लंड आणि द. आफ्रिकेविरुद्ध अनुक्रमे अफगाणिस्तान आणि नेदरलँड् यांच्या विजयानंतर भारतही सावध झाला आहे.
फलंदाजीमध्ये कर्णधार रोहित शर्मा आपला शानदार फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर शुभमन गिल आणि विराट कोहली मोठा स्कोर करण्यास उत्सुक असतील. रोहितने गेल्या दोन सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ८६ आणि अफगाणिस्तानविरुद्ध १३१ धावांची खेळी करत आपला दबदबा ठेवला आहे.
विश्वचषकात भारत-बांगलादेश टक्कर
भारत आणि बांगलादेश हे विश्वचषकात आतापर्यंत चार वेळा आमनेसामने आले आहेत. टीम इंडियाला केवळ २००७मध्ये बांगलादेशविरुद्ध पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर २०११, २०१५ आणि २०१९च्या विश्वचषकात भारताने सामने जिंकले होते.