Thursday, September 18, 2025

बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगरमध्ये माकडांचा हैदोस

बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगरमध्ये माकडांचा हैदोस

अवधूत गुप्ते यांनी व्हिडिओ शेअर करत मांडली व्यथा

मुंबई : ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' जवळच्या श्रीकृष्ण नगरात सध्या माकडांनी हैदोस घातला आहे. ही माकडं सर्रास घरात घुसत असल्याचा व्हिडिओ शेअर करत अवधूत गुप्ते यांनी वनविभागाचे लक्ष वेधले आहे.

कोरोना महामारीच्या कालावधीत 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात!' असे त्यांनी सविस्तर पोस्ट मध्ये लिहीले आहे.

तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की, हा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगर मधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे. अनेकांनी वनखात्याकडे तक्रार देखील केली आहे. वनखाते देखील काही उपाययोजनांचा विचार नक्कीच करत असेल, ह्याची मला खात्री आहे.

‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान‘ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवत देखील आलो आहोत. पण, माकडांचा त्रास हा कोरोना पश्चात कित्येक पटींनी वाढला आहे, हे मात्र खरं!

ह्याचं खरं कारण म्हणजे "त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी ह्याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज्!"

त्यामुळे ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता ‘शंभर टक्केच्या वन्य जीवनाला‘ मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात. आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातात सुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात.

माकडं यायची. कोरोना आधी सुद्धा यायची. पण, महिन्या-दोन महिन्यातून चुकून भरकटत यायची. कोरोना काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला ह्या माकडांचा खुराक. मग ह्या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात!

बाकी स्ट्रगल चालूच राहील..

फक्त ह्यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments
Add Comment