Tuesday, September 16, 2025

डहाणू, तलासरीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

डहाणू, तलासरीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात भूकंपाची श्रृंखला सुरूच आहे. मागील सहा महिन्यांपासून थांबलेली भूकंपाच्या धक्क्यांची मालिका पुन्हा सुरू झाली आहे. शनिवारी एका पाठोपाठएक असे दोन भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबले.

डहाणू, तलासरी परिसरातील गावांना सतत सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू, घोलवड, बोर्डी, धुदवाडी, तलासरी ही गावे भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहेत. गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान, भिलाड आणि दादरा-नगर हवेली येथील सिल्वासापर्यंत भूकंपाचे हादरे बसले आहेत. यात जीवितहानी झाली नसून काही घरांना मात्र तडे गेले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांनी मुहूर्त साधला असून पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यातील काही गावे पुन्हा हादरली. मागील काही वर्षांपासून डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून भूकंपाचे धक्के थांबले होते. मात्र शनिवारी लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी ५ वाजून १६ मिनिटांनी ३.५ रिश्टर स्केलचा, तर ५ वाजून २४ मिनिटांनी जाणवलेल्या दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली.

डहाणू-तलासरी तालुक्यातील गावांमध्ये शनिवारी जोरदार भूकंप होऊन जमीन चांगलीच हादरली, हे जोरदार धक्के बसल्याने तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही भयभीत होऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.

Comments
Add Comment