Monday, September 15, 2025

जागावाटपाच्या वेळी ‘मोठा भाऊ’ अडचणीचा ठरणार?

जागावाटपाच्या वेळी ‘मोठा भाऊ’ अडचणीचा ठरणार?

मुंबई (विशेष प्रतिनिधी): उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा लोकसभेसाठी १९ जागेचा राग आळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीत आपणच मोठे भाऊ असल्याचा दावा केल्यामुळे महाविकास आघाडीतली मतभिन्नता आणखीनच तीव्र झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी यावर जरी मवाळ भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळी महाविकास आघाडीतला मोठा भाऊ अनेकांना त्रासदायक ठरणार असल्याची ही चिन्हे आहेत, असे जाणकारांना वाटते.

दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडी सर्व जागा लढवेल आणि त्यातल्या १९ जागा तेव्हाच्या शिवसेनेच्या होत्या, तेवढ्या जागा आमच्या कायम राहतील, असा दावा केला. आज याचा पुनरुच्चार करताना पुन्हा त्यांनी ४८ पैकी १९ जागा शिवसेनेच्या असतील असे नमूद केले. यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेला असंतोष खदखदत असतानाच आज एका मेळाव्यात अजित पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसला आम्ही मोठा भाऊ मानत आलो आहोत; परंतु मागच्या निवडणुकीत विधानसभेतले आकडे दाखवून देतात की आम्ही ५४ आहोत, तर तुम्ही ४४ आहात. त्यामुळे आता मोठे भाऊ आम्हीच आलो आहोत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे अजित पवार म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आम्ही पूर्वीपासून कधीही मोठेपणा मिरवला नाही, असे सांगितले. अनेक वर्षे आमची सदस्यसंख्या नेहमीच जास्त राहिली. मात्र आम्ही सर्वांना आमच्या बरोबरीनेच नेले. सर्वांशी समन्वयातच संबंध ठेवले, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment