Tuesday, September 16, 2025

सोनिया गांधीची ६ तास ईडी चौकशी, बुधवारी पुन्हा बोलावले

सोनिया गांधीची ६ तास ईडी चौकशी, बुधवारी पुन्हा बोलावले

नवी दिल्ली (हिं.स.) : नॅशन हेराल्डशी संबंधीत मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची 6 तास चौकशी केली. त्यांच्या चौकशीची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान ईडीने त्यांना उद्या, बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंगळवारी ईडीने सोनिया गांधींची दोन फेऱ्यांमध्ये चौकशी केली. सोनिया गांधी या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवरील विद्युत लेनमध्ये असलेल्या ईडीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता पोहोचल्या. यानंतर ईडी कार्यालयातून दुपारच्या जेवणासाठी निघाल्या. तसेच दुपारी ३.३० वाजता परत आल्या. याप्रकरणी २१ जुलै रोजी सोनिया गांधी यांची पहिल्यांदा दोन तास चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणी राहुल गांधी यांची ५० तासांहून अधिक चौकशी झाली आहे.

दुसरीकडे, सोनिया गांधी यांच्या चौकशी सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. काँग्रेसने ईडीच्या कारवाईला राजकीय द्वेषाचे कृत्य म्हटले आहे. राहुल गांधी आणि इतर काँग्रेस खासदारांनी आज संसद भवनापासून मोर्चा काढला. हे सर्वजण राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना विजय चौकात अडवले. यानंतर या नेत्यांनी तेथे धरणे दिले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले.

Comments
Add Comment