
मुंबई : चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शक लीना मणिमेकलाई यांनी २ जुलै २०२२ रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘काली’ या माहितीपटाचे अर्थात डॉक्युमेंट्रीचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरसह कॅप्शन लिहिताना त्या म्हणाल्या की, मी खूप उत्साहित आहे कारण ‘काली’ हा माहितीपट कॅनडा चित्रपट महोत्सवात लाँच करण्यात आला होता. मात्र या पोस्टमुळे नेटकरी प्रचंड संतापले असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालय, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, अटक करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
या माहितीपटाच्या पोस्टरमध्ये काली माता साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. इतकेच नाही तर, काली मातेच्या हातात एलजीबीटीक्यू (LGBTQ) वर्गाचा झेंडाही दाखवण्यात आला आहे. लीना यांनी हे पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. यानंतर आता लीना यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
https://twitter.com/LeenaManimekali/status/1543200394477805568दरम्यान दिल्लीतील एका वकिलांनी आज दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. वकील जिंदाल म्हणाले देवी कालीला स्मोकिंग दाखवून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. जे आक्षेपार्ह आहे. ते कोणत्याही प्रकारे स्वीकारले जाऊ शकत नाही. संबंधितांवर तत्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.