Sunday, September 14, 2025

विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाला टाळे, चर्चेचा विषय

मुंबई (हिं.स.) : विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदार विधिमंडळात समोरासमोर येणार आहेत. मात्र, त्याआधीच विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयाला टाळे लावण्यात आले आहे.

शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना दरवाज्यावर लिहिण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे विधानभवनासह राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा आमचा असून दोन तृतीयांश आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर गटाने केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने बंडखोर सदस्य पक्षात नसल्याचे म्हटले आहे.

त्यातील काही नेत्यांची पदावरून हकालपट्टी देखील केली आहे. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम विधीमंडळातील पक्षाच्या दालनावरही दिसून येत आहे. विशेष म्हणजे या पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले आहे.

Comments
Add Comment