Monday, October 27, 2025
Happy Diwali

मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

मुंबई : राज्यातील राजकीय संघर्षाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरात कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून १० जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केले आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राज्याच्या अनेक भागांत बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत निषेध मोर्चे काढले आणि त्यांच्या फलकांना काळे फासले आहे. तर काही ठिकाणी कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. बंडखोर आमदार राज्यात परतल्यावर संघर्ष वाढण्याचीच ही पूर्वलक्षणे मानली जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी १० जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उप आयुक्त यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार व महत्त्वाचे नगरसेवक यांचे कार्यालय, निवासस्थान, शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेऊन आगाऊ माहिती काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका याठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याबाबत सांगण्यात आले आहे. विशेष शाखेने सोशल मिडीयावर लक्ष ठेवून संबधितांना आवश्यक माहिती त्वरीत देण्यास सांगितले आहे. स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालीबाबत माहिती घेवून योग्य कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांच्या परिपत्रकात म्हटले आहे.

“कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही याबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. आवश्यक प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सर्वांनी सजग राहून कर्तव्य करणे अपेक्षित आहे,” अशाही सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >