Thursday, September 18, 2025

नागपूरात गडकरींच्या उपस्थितीत योग प्रात्यक्षिके होणार सादर

नागपूरात गडकरींच्या उपस्थितीत योग प्रात्यक्षिके होणार सादर

नागपूर (हिं.स.) : केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा प्रसंगी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे निमित्त देशातील ७५ ठिकाणी योगदिन कार्यक्रमाचे आयोजन होणार असून या वर्षीच्या योग दिवसाची संकल्पना ‘मानवतेसाठी योगा’ अशी आहे.

नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जनार्दन योगाभ्यासी मंडळ यांच्या तसेच नागपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी ६ ते ६.४० दरम्यान योगा प्रात्यक्षिके सादर केले जातील. या कालावधीत केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत योग प्रात्यक्षिक सादर झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६.४० ते ७ वाजेच्या दरम्यान म्हैसुरू इथून देशातील ७५ ठिकाणांना संबोधित करतील.

यासंदर्भात माहिती देताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूरचे प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूरतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध विकास कार्याची देखील माहिती यावेळी दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण-एनएचएआय हे रस्तेबांधणी सोबतच पर्यावरण पूरक आणि जलसंवर्धनाच्या उपक्रसाठी कटिबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.

भंडा-याच्या साकोली येथील उड्डाणपूल एनएचएआयतर्फे बांधल्या गेले असून ते ‘स्टेट ऑफ आर्ट’ आहेत. रस्तेबांधणीत तलावाच्या खोलीकरणातून वापरलेली माती वापरल्याने अकोल्याच्या पीकेव्ही परिसरात जलसंवर्धन झाले आहे. एनएचएआय तर्फे वृक्षारोपण रस्त्याच्या मध्यिकेत तसेच उर्वरित महामार्गाच्या जागेत होत असून प्रत्येक वृक्षाचे जिओ टॅगिंग होत असल्याने त्याच्या संवर्धनावर प्राधिकरणाचा भर असल्याचे राजीव अग्रवाल यांनी यावेळी स्पष्ट केले. नागपूर शहरातील एकूण ६२ किमी लांबीच्या आऊटर रिंग रोडच्या बांधकामापैकी २४ किमीचे बांधकाम झाले असून उर्वरित प्रगतीपथावर आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी योगासनाचे महत्व जनमानसात पोहोचणे आवश्यक असून योगदिवस हा त्यासाठी महत्वाचा सोहळा असल्याने नागरिकांनी २१ जून या दिवशी कस्तुरचंद पार्क येथे उपस्थित रहावे असे आवाहन केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा