
मुंबई : जीएसटीच्या परताव्याची पूर्ण रक्कम महाराष्ट्राला मिळालेली नाही, असा दावा महाविकास आघाडी सरकारने केला आहे. दुसरीकडे केंद्राने आम्ही जीएसटीच्या परताव्याचे सर्व पैसे चुकते केले, असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जीएसटीच्या परताव्याच्या रक्कमेवरून महाराष्ट्रात केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पुन्हा एकदा तापला आहे. दरम्यान, यामध्ये भाजपाचे निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. अर्थमंत्री हे पद बुद्धिमान माणसाकडे असावे, असा टोला राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1531883758286163969“अजित पवार म्हणतात जीएसटीचे ५० टक्के पैसे मिळाले अजून १५ हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र पाच लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण जीएसटीच्या ३० - ४० हजार कोटींवर चर्चा होते. यावरून लक्षात येते अजित पवारांचा फायनान्स विषय कच्चा आहे. बुध्दीमान माणसाकडे हे खाते असावे,” असा टोला निलेश राणेंनी ट्विटरवरुन लागवला आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1531871379439554560तसेच अन्य एका ट्विटमध्ये, “सगळी चर्चा जीएसटीवर पण ठाकरे सरकारने दोन वर्षात दोन लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर लादलं आहे. या विषयावर कोण बोलत नाही. दोन वर्षात महाराष्ट्राला दोन लाख कोटींनी गरीब करणारं सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे. कर्जावर व्याज ५० हजार कोटी, कर्ज वेळेत भरणार कसं हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सांगत नाही,” असे निलेश राणेंनी म्हटले आहे.
दरम्यान, आता निलेश राणे यांच्या या टीकेमुळे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली होती. केंद्रावर दोषारोप हाच पुरूषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच आतातरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात तत्काळ कमी करा, असेही फडणवीस म्हणाले आहेत.