Thursday, September 18, 2025

गुन्हे सिद्ध करण्यात मीरा-भाईंदर राज्यात प्रथम

गुन्हे सिद्ध करण्यात मीरा-भाईंदर राज्यात प्रथम

अनिल खेडेकर

भाईंदर : मीरा-भाईंदर, वसई विरार परिसरातील गुन्हेगारी नष्ट करत असतानाच पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाने गुन्ह्यांचा योग्य रीतीने तपास करत तसेच ठोस पुरावे सादर केल्यामुळे गुन्हे सिद्ध करण्यात ८९.६३% गुण मिळाले असून महाराष्ट्र राज्यात आयुक्तालयाने पहिला क्रमांक पटकावला आहे.

ठाणे तसेच पालघर ग्रामिण पोलीस अधीक्षक कार्य क्षेत्रात असणाऱ्या मीरा-भाईंदर, वसई विरार भागातील पोलीस ठाणे एकत्रित करून या दोन शहरांसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० मध्ये करण्यात आली. नव्याने स्थापन झालेल्या आयुक्तालायची जबाबदारी सदानंद दाते यांच्यावर सोपविण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ५५. ३६ टक्के आहे. नुकतीच या वर्षीच्या दोषींची आकडेवारी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्रात सर्व पोलीस आयुक्तालयामधून गुन्हे सिद्ध करण्यामध्ये ८९.६३ टक्के गुण मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला मिळाले आहेत.

त्याचबरोबर नव्याने स्थापन झालेल्या या आयुक्तालयाने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर ५८.४९ टक्के गुण मिळवून अमरावती पोलीस आयुक्तालय दुसऱ्या क्रमांकावर, ५४.७८ टक्के गुण मिळवून नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर, तर ५४.०८ टक्क्यांसह ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई, नागपूरसारखी मोठी शहरी आयुक्तालय दूर पडली असून मुंबईला ५२.१८ तर नागपूरला ५१.६३ टक्के गुण मिळून ते पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर गेले आहेत.

Comments
Add Comment