Monday, September 15, 2025

मुंबईत ६ जूनला मेघ बरसणार

मुंबईत ६ जूनला मेघ बरसणार

मुंबई (प्रतिनिधी) : वाढलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेले समान्यजन पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच अंदमानात सोमवारी मान्सूनचे आगमन झाले असून तो तब्बल ६ दिवस आधीच तेथे पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्याचे आगमन लवकर होणार आहे.

केरळात २७ मे रोजी तो दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तशीच स्थिती अनुकूल राहिल्यास मुंबईत ६ जूनला तर ११ जूनला मराठवाड्यात मान्सून पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, ११ जूनपर्यंत मान्सून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या वर्षी खंड पडल्याने १० जुलैपर्यंत या भागांत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागली होती. त्या तुलनेत यंदा महिनाभर आधीच वरुणराजाचे आगमन होण्याचे संकेत आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, तळकोकणात २ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर तसे संकेतही मिळण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीच्या समुद्रात सध्या लाटांसोबत सध्या फेस मोठ्याप्रमाणावर वाहून येत आहे. पावसाचे आगमन होण्यापूर्वी लाटांना अशाप्रकारे फेस यायला (फेणी) सुरुवात होते, असे स्थानिक मच्छिमारांचे म्हणणे आहे. याशिवाय, समुद्रात दक्षिण दिशेला वारे वाहायला लागले आहेत. या सगळ्या गोष्टी मान्सूनच्या आगमनाचे संकेत मानले जातात. त्यामुळे लवकरच मान्सून कोकणात दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

अंदमानच्या समुद्रात सोमवारी मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. नैऋत्य मान्सून अंदमानच्या समुद्रात सहा दिवस आधीच दाखल झाला आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये १८ मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीसह राज्यातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातार, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांचा समावेश असून येथे ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

Comments
Add Comment