Thursday, September 18, 2025

उड्डाणपुलाच्या नावावरून कलगीतुरा

उड्डाणपुलाच्या नावावरून कलगीतुरा

पालघर (प्रतिनिधी) : नायगाव पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. तो लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत नागरिक असतानाच या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून राजकीय पक्षांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे.

नायगाव पूर्व व पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी गेली सत्तर ते पंचाहत्तर वर्षे रस्ता उपलब्ध नव्हता. या मार्गातून रेल्वे जात असल्यामुळे रस्ता तयार करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या दोन्ही परिसरांतील नागरिकांना द्राविडी प्राणायाम करावा लागत असे. यामध्ये नागरिकांना इंधनाचा खर्च व पदरमोड करावी लागत असे. दरम्यान, या सारया अडचणींचा विचार करून सात वर्षांपूर्वी येथे उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी देण्यात आली. पण पुलाचे काम सुरू होत नव्हते.

चार वर्षांपूर्वी कामास सुरुवात झाली, पण कालांतराने काही अडचणी उभ्या राहिल्या व पुलाचे काम रखडले. विविध विभागांच्या परवानग्या मिळवणे व स्थानिक पातळीवरील समस्यांवर मात करत प्रशासनाने अखेर काम सुरू केले व अल्पावधीत उड्डाणपूल उभारला. पण आता या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे यावरून राजकीय पक्षांमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे.

शिवसेनेने स्थानिक नेते स्व. धर्माजी पाटील, काँग्रेसने स्व. मायकल फुटयार्डो, भाजपने माजी खासदार स्व. चिंतामण वनगा, मुस्लिम ट्रस्टने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा नावांची शिफारस केली आहे. नावाचा हा वाद आता रंगू लागला आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी नायगाव उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment