
मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. “भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणं बाहेर येत असल्याने संजय राऊत यांची आदळआपट सुरू आहे. संजय राऊत आज एकाकी पडले आहेत, त्यांच्या बाजूने बोलायला महाविकास आघाडीमधील एकही नेता तयार नाही.” असा चौफेर टीकेचा भडीमार शेलार यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “सात वर्षे रोज तुम्ही बोलत आलात, लिहीत आलात, रोज विपर्यास करत आलात. सात वर्षे रोज तुम्ही भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आलात. पण सात वर्षात तुमच्या मागे का नाही ईडी लागली? याचा अर्थ तुम्ही बोललात म्हणजे तुमच्या मागे ईडी लागली. ही तुमची कोल्हेकुई आहे, हे सत्य नव्हे. आज ज्यावेळी तुमची सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येण्याच्या दिशेने आहेत. त्यावेळी तुमची आदळआपट, तडफड, थयथयाट होत आहे.”
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1492042053693624321तसेच, “राजकारणातलं दुर्दैव काय आहे बघा, महाविकास आघाडीतील लोकांना कळालं पाहिजे म्हणून मी दुर्दैव हा शब्द वापरतोय. ज्या संजय राऊतांनी आगपाखड सगळी एकत्र करून, या नवीन महाविकास आघाडीच्या जन्मासाठी प्रयत्न केले ते आज एकाकी पडले आहेत, त्यांच्या बाजूने कोणी वक्तव्य करायला तयार नाही. त्यांच्या समर्थानार्थ शिवसेनेचा एक नेता बोलायला तयार नाही. एवढच नाही तर ज्या राष्ट्रवादीच्या गोदीत ते जाऊन बसले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते किंवा अन्य कोणी नेते जाहीरपणे त्यांची बाजू मांडायला तयार नाहीत आणि परिस्थिती संजय राऊत यांची आली, की आज एकदा नाही किमान तीनदा त्यांना हे बोलावलं लागलं, एकदा लिहून, दोनदा स्वत: म्हणून की सत्तेत बसलेले काय करत आहेत बोला. मंत्रीपदावर बसलेल्यांनी बोललं पाहीजे आणि लिहून त्यांनी लेखाद्वारे म्हटलं मुंबईतील, राज्यातील पोलीस यंत्रणा काही करत नाही का? दुर्दैवाने ते एकटे पडले आहेत. एकलकोंडे झाले आहेत, मला त्यांची आता चिंता वाटायला लागली आहे. अशी परिस्थिती राजकारणात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून संजय राऊत यांची केलेली आहे.” असंही शेलार यांनी यावेळी बोलून दाखवलं.
याचबरोबर पंतप्रधान मोदी नि:पक्षपातीपणे बोलत नाहीत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. यावर बोलताना शेलार म्हणाले की, “तुमच्या बाजूने बोललं म्हणजे ते नि:पक्षपातीपणा, तुमचं काळंबेरं बाहेर काढलं, सत्य काढलं म्हणजे ते चूक, तो पक्षपातीपणा? ज्या माणसाचा स्वत:चा पक्ष कुठला हे कळत नाही, अशा नेत्याने म्हणजेच संजय राऊतांनी असं विधान करणं म्हणजे हास्यास्पद आहे. निष्पक्ष आणि पक्ष यावर बोलण्याचा खरंतर अधिकार त्यांना आहे का? हा प्रश्न आहे. याचं कारण, गेली सहा-सात वर्षे सातत्याने मोदी सरकार, भाजपाच्या विरोधात नेहमी बोलले आणि प्रत्येक निवडणुकीत नेहमी तोंडावर पडले ते संजय राऊत आज निष्पक्षपणाची गोष्ट करत आहेत.”
“संजय राऊत याचं उत्तर देतील का? केंद्रीयमंत्री पदावर बसलेले नारायण राणे यांच्यावर आपण नि:पक्षपातीपणाने गुन्हा दाखल केला होता? याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतील का? की ज्या कोकणातील प्रकरणात खरचटलं आहे की लागलंय हे कळत देखील नाही, त्या व्यक्तीच्या संदर्भात आमचे आमदार नितेश राणे यांच्यावर तुम्ही गंभीर गुन्हा दाखल केला, हा नि:पक्षपातीपणा होता का?” असा सवाल करत शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
तर, “अमरावतीमध्ये शाईफेक घटना घडली तेव्हा माझ्या माहितीनुसार आमदार राणा तिथे नव्हतेच, तर शाई फेकली कोणी तरी तर त्याचं समर्थन आम्ही करत नाही आहोत. पण शाई फेकली म्हणून कलम ३०७ चा गुन्हा हजर नसलेल्या आमदारावर? हा नि:पक्षपातीपणा आहे? मुंबई आणि राज्यातील पोलिसांचा वापर ज्या पद्धतीने केला जातो आहे, पक्षपातीपणा यामध्ये आहे. ईडी आणि सीबीआय केवळ चौकशी करत आहेत तर तुमचा थयथयाट सुरु आहे.” असेही शेलार म्हणाले.