अजित पवारांचा पाच दिवसांपूर्वी मराठवाड्याचा शेवटचा दौरा :
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाच दिवसांपूर्वीच मराठवाडा दौऱ्यावर आले होते. हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता अजित पवार नांदेडच्या विमानतळावर दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी वेळ असल्याने विमानतळावरील स्वागत स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेडच्या शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. तेथून दुपारी अडीच वाजता त्यांनी नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. त्या ठिकाणी त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. कार्यकर्ते व भाविकांशी चर्चा करून ते नांदेड येथील मोदी मैदान येथील कार्यक्रमाकडे रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांनी १६ मिनिटे मराठी व हिंदीतून भाषण केले. श्री गुरुतेग बहादूर यांच्या बलिदानाचा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख करून त्यांनी अभ्यासपूर्ण भाषण केले. विशेष म्हणजे निवेदकांच्यावतीने त्यांना भाषणाअगोदरच मराठी आणि हिंदीतून या दोन्ही भाषेतून मनोगत व्यक्त करण्याची विनंती केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो शब्द पाळत १६ मिनिटांचे भाषण केले.