मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या प्रशासनात आणि राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ‘शब्दाचा पक्का’ आणि ‘हिशोबाचा पक्का’ अशी ओळख असलेल्या पवारांच्या जाण्याने राज्याचा अर्थकारभार कोण सांभाळणार, असा पेच ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर निर्माण झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीही फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून, त्यांचा प्रशासकीय अनुभव लक्षात घेता सध्याच्या तातडीच्या परिस्थितीत राज्याची तिजोरी मुख्यमंत्र्यांकडेच राहण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत असून, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांनी अर्थखात्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. त्यांच्या अनुपस्थितीत नव्या अर्थमंत्र्यांना अत्यंत कमी कालावधीत अर्थसंकल्पाची तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.