प्राची परचुरे – वैद्य, आत्मज्ञान
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना आपण ऐकली असेलच. ते गाणं पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. कितीही वेळा ऐकले तरी मन आणि कान तृप्त होतच नाहीत. ते गाणं सध्याच्या वास्तव परिस्थितीवर असावं असं वाटतं. “खरंच किती गहन अर्थ आहे त्यात ! पण खरंच आपल्या आजूबाजूची परिस्थिती तशी आहे? मी, माझे, माझी नोकरी, माझे कुटुंब, सगळे काही मी आणि माझे या भोवतीच माणूस सतत गुरफटलेला दिसतो. कधीतरी आपण कोणाला काही कारणास्तव मदतीचा हात पुढे करावा असे वाटणारी लोकं समाजात फारच कमी आणि इतरांच्या टाळूवरचे लोणी खाणारे जास्त असा प्रकार आपल्याला दिसून येतो. कधीतरी स्वतः पलीकडेही जग असते त्याचाही विचार करा. तुमचे कर्म व तुमचा दृष्टिकोन एवढंच महत्त्वाचं आहे. जग तुम्हाला कोणत्या नजरेने बघतं काही फरक पडत नाही.
कधी ही कोणाची मदत करताना स्वार्थ न ठेवता कोणाच्या नकळत मदत करा. निःस्वार्थ मदत माणुसकीच्या भावनेतून केली जाते. जगात अशी खूप कमी माणसे आहेत जे दुसऱ्याला मदत करतात; परंतु गरजवंताला मदत केल्याने जे आत्मिक समाधान मिळते त्या अनुभवाचे वर्णन शब्दांत नाही करता येत आणि तो अनुभव प्रत्येकाने स्वतः घ्यावा. दुसऱ्याची मजा पाहणे किंवा त्याला दुःखात पाहणे हे खूपच सोपे आहे पण एखाद्याला कधीतरी मदत करून तर पाहा. रोजच्यापेक्षा शांत आणि तृप्त मन होऊन जाईल. इतरांचे दुःख आपले माना, संवेदनशील राहा, त्यानंतर मदत करा आणि स्वतःचीच मदत केली असं समजा आणि तेही खरेच आहे दुसऱ्याची मदत करून तुम्हाला पुण्याचं मिळणार आहे, ज्याला तुम्ही मदत करताय त्याचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही पुढे जाणार आहात. फक्त इतरांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ठेवा व शक्य झाल्यास परतफेड करण्याचा प्रयत्न करा; परंतु आपण केलेली मदत लक्षात न ठेवता विसरून जा.
समाजात काही चांगली माणसंही आहेत त्यामुळेच तर समाज टिकून आहे. जर कोणी तुमच्याशी चांगलं वागत असेल तर तो त्याचा स्वभाव आहे, स्वार्थ नाही. बहुधा, कोणत्याच अपेक्षेशिवाय ही फक्त आपली मदत करण्याचाच हेतू असू शकतो इतर काही नाही हे विसरू नका. उदा. अशा अनेक समाजसेवी संस्था आहेत आणि त्यात काम करणारे स्वयंसेवी कार्यकर्ते स्वतःचे व्यवसाय, कामधंदे सांभाळून जसा वेळ मिळेल तसा या समाजसेवी संस्थेत नि:स्वार्थ मदत करत असतात.
उगाचच कोणाबद्दल गैरसमज मनात बाळगू नये आणि एखाद्याविषयी मनात गैरसमज निर्माण झाला असेल, तर तो त्या व्यक्तीशी बोलून मोकळे व्हावे. एखाद्या व्यक्तीचे विचार पटत नसतील तर त्याच्याशी बोलू नका कारण शब्दाने शब्द वाढतो आणि हाती काहीच लागत नाही. तुमच्या काही बोलण्यापेक्षा तुमचं न बोलणं समोरच्याला जास्त त्रास देऊन जातं. शब्दांपेक्षा आपली वर्तणूक समोरच्याला खूप काही सांगते. त्यामुळे, आपल्या विचारांना गती द्या व एकाच चुकीच्या दृष्टीने विचार न करता इतर चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या जेणेकरून आपला सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.