Home क्राईम नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

0
नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील गुमगाव परिसरात घरगुती वादातून झालेल्या गोळीबारात एका प्राध्यापकासह तिघे जण जखमी झाले आहेत. या घटनेत एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. गुमगावमधील गज्जू नावाच्या व्यक्तीचा देवतळे कुटुंबाशी अनेक दिवसांपासून घरगुती वाद सुरू होता. या वादातूनच रागाच्या भरात आरोपीने थेट बंदूक काढत गोळीबार केला.

या हल्ल्यात प्राध्यापक नितीन देवतळे, प्रविण देवतळे तसेच त्यांच्यासोबत असलेला एक मित्र गोळी लागून जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपीने दोन राऊंड फायरिंग केल्याचे समोर आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरदिवसा आणि वस्ती असलेल्या भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गुमगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, तसेच त्याच्याकडे शस्त्र कसे आले, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.