Home संपादकीय विशेष लेख नेत्यांमधीलच खुन्नस दिसू लागली

नेत्यांमधीलच खुन्नस दिसू लागली

0
नेत्यांमधीलच खुन्नस दिसू लागली

दक्षिण महाराष्ट्र – वार्तापत्र

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे राजकारण नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्याबाबतीत सध्या जोरावर आहे. कार्यकर्त्यांची ही निवडणूक मानली जात असली तरी प्रत्यक्षात जिल्ह्याचे नेते म्हणून होणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये खुन्नस इतकी दाटून भरली आहे, की त्यांची कृती आणि वक्तव्ये याची साक्ष देऊ लागलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीतून विधान परिषदेच्या आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे राजकारणही केले जात आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नेमक्याच टप्प्यात पोहोचल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका पूर्ण करण्याचे बंधन असताना, राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदान २ डिसेंबरला होणार असून, निकाल ३ डिसेंबरला येणार आहे. यामध्ये दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर ही तीन जिल्हे प्रमुख भूमिकेत आहेत. या भागातील ४३ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (नगर परिषदा आणि नगरपंचायती) चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. येथील राजकीय पक्षांच्या युती आघाड्या आणि त्यांच्यातील अंतर्गत कलह यामुळे दक्षिण महाराष्ट्र हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे. येथे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती आणि काँग्रेस-शिवसेना (उद्धव ठाकरे गट)-राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी (मविआ) या दोन प्रमुख आघाड्या आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर गटबाजी आणि स्वबळाची मागणी यामुळे युतींमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवेंद्रराजे आणि देसाई वाद

सातारा जिल्ह्यात चार मंत्री आहेत. यात दोन भाजप, एक शिंदेसेना व एक राष्ट्रवादीचा आहे. शिंदेसेनेतील मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथील सभेत बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांना ‘शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मान राखावा, अन्यथा वेगळी भूमिका घेऊ असा इशारा दिला होता. हाच धागा पकडत शिवेंद्रसिंहराजे यांनी पालकमंत्र्यांना त्यांच्याच शैलीत उत्तर दिले. पालकमंत्र्यांना आम्ही कधीच कमी लेखत नाही, पण जसा पाटणमध्ये निर्णय ते घेतील तसाच मेढ्यात होईल, असे ते म्हणाले. दोन मंत्र्यांच्या या राजकीय जुगलबंदीमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शिवाय सातारा नगरपालिकेला शिवेंद्रराजे आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यात सत्ता स्पर्धा आहे ती वेगळीच. कराड आणि साताऱ्यामध्ये नगराध्यक्ष पद प्रदीर्घ काळानंतर खुले झाल्याने पुरुष नगराध्यक्ष होणार म्हणून इच्छुकांची प्रचंड गर्दी नेत्यांचा कस लावणारी ठरणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील ३८ नगर परिषदा आणि ५ नगरपंचायतींमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय नेते सक्रिय झाले आहेत.

यड्रावकरांच्या विरोधात रणनीती

कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण तर वेगळ्याच वळणावर चालले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपतात कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची गणितेही आखली जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मंत्र्यांची वाढती संख्या, प्रत्येक पक्षात फूट पडून झालेले दोन गट यामुळे इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यांचे पुनर्वसन कसे करायचे आणि शब्द कोणता द्यायचा हा नेत्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे तडजोड, युती, आघाडी यापेक्षा ‘अंडरस्टँडिंग’ला महत्त्व येण्याची शक्यता आहे. अर्थातच हे पीक हायब्रीड असेल. जो सक्षम असेल तो निवडून येईल या तत्त्वावर नेते आपापल्याच मित्र पक्षाचा घात करायलाही कमी करणार नाहीत याची चिन्हे दिसत आहेत. चंदगडचे उदाहरण यापूर्वीच्या वार्तापत्रात होतेच. आता सध्या शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे पारडे जड होऊ नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील इतर मातब्बर मंडळी एक होऊन यड्रावकर यांची ताकद कमी करण्यास पुढे सरसावले आहेत. आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिडकर, खा. धैर्यशिल माने, रामचंद्र डांगे, हे नेते एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आ.सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे शिरोळ तालुक्याचे नेते माधवराव घाटगे, दत्त साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव पाटील हे नेते असणार आहेत. आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिरोळ जयसिंगपूर आणि कुरूंदवाड नगरपालिका निवडणुकीत विरोध करण्यासाठी आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, खा. धनंजय महाडिक हे कट्टर विरोधक दोन नेते एकत्रित येत आहेत अशी चर्चा आहे. गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक या निवडणुकीची निर्णायक मते राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे आहेत. शिवाय विधान परिषद निवडणुकीत आ. डॉ. यड्रावकर यांची भूमिका निर्णयक राहू नये म्हणून ही तजवीज आहे. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत २१ वरून २५ इतकी संचालक संख्या होऊ नये म्हणून ताराराणी आघाडीचे नेते महादेवराव महाडिक प्रयत्न करत होते. मात्र सत्ता पक्षातीलच इतर घटकांनी त्यांची मोहीम हाणून पाडून संचालक संख्या वाढवून आणल्याने महाडिकांना इतर पक्ष मिळून धक्का देण्याची तयारी करत आहेत हेही स्पष्ट झाले आहे. पुढच्या दहा दिवसांत संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण कसे एकमेकांविरोधात लढवले जाते ते पाहणे जनतेला अचंबित करणारे असू शकते.

चंद्रकांतदादा बोलले जयंतराव खुलले

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे वक्तव्य म्हणजे भाजपच्या नेत्यांना एक डोकेदुखी झाली आहे. दादा बोले दल हाले असे आतापर्यंत सांगलीची परिस्थिती होती. पण आता दादा बोलले आणि जयंतराव पाटील फुलले अशी परिस्थिती झाली आहे. राजकारणात काय सांगावे आणि काय सांगायचे टाळावे हे ठरवून बोलावे लागते. चंद्रकांत दादा सगळेच बोलून जातात आणि मग पक्षात लोक नाराज होतात. दिवाळीत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्या जयश्री पाटील यांच्या घरी भेट देताना त्यांनी महापालिका निवडणुकीत त्यांच्या २२ लोकांना भाजपचे तिकीट देण्याचे सूतोवाच केले. त्यामुळे दादांसाठी रणनीती आखणारी मंडळी अडचणीत आली. आमदार सुधीर गाडगीळ यांना टोकाची भाषा बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी जयश्री पाटील यांच्या उमेदवारांना तेवढ्या जागा सोडण्यास विरोध केला आणि भाजपच्या निष्ठावंतांना न्याय देण्याची मागणी केली. मग चंद्रकांतदादांनी त्यावर बोलताना जयश्री पाटील यांच्याकडे आलेले लोक २२ नव्हे तर केवळ सहाच आहेत आणि त्या सहा लोकांना तिकीट देऊ असे शब्द फिरवले. भाजपकडे येऊ घातलेली मंडळी वरमली. महापालिका निवडणुका अद्याप दृष्टिपथातही नसताना दादांनी केलेल्या या गडबडीमुळे जयंत पाटील यांना नगरपालिका नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा राजकारण करणे सोयीचे झाले. इतके दिवस संधीची वाट पाहत बसलेले आणि जिल्ह्याच्या राजकारणात एकाकी पडलेले जयंत पाटील दादांच्या या बोलाने खुलले. त्यांनी भाजपविरोधात जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी सहित विविध पक्षातील नाराज मंडळींना एक करून आपल्यासोबत जोडले. काँग्रेसमध्ये खासदार विशाल पाटील यांच्याशी असणारा दुरावा विश्वजीत कदम यांच्या मदतीने संपवला आणि महाविकास आघाडीचे दमदार पॅनल होईल, इतर पक्षांचे लोक भाजपला आव्हान देतील अशी रणनीती आखण्यास सुरुवात केली. विखुरलेल्या आघाडीला एकजूट होण्याची संधी लाभली. आता भाजपवर मित्र पक्षांची डारडूर सुरू झाली आहे. दादांचे बोलणे भाजपला अडचणीत आणणारे ठरले आहे. आता पुन्हा जयंत रावांचा खेळ उद्ध्वस्त करण्यासाठी नेत्यांना नव्याने इतरांची म्हणून धरणी करण्याची वेळ आली आहे.