अलवर : राजस्थानमधील अलवर येथे अनुदानीत वाणिज्य महाविद्यालयात वरिष्ठ शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया सुरू असताना महाविद्यालयाच्या आवारातील एका बाकड्याखाली (बेंच / आसन) काहीतरी मोठी वस्तू असल्याचे एका व्यक्तीला जाणवले. खात्री करुन घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला रांगेत उभ्या असलेल्या दोघातिघांना त्याच दिशेने बघण्यास सांगितले. यानंतर सर्वांचीच खात्री झाली की तिथे वस्तू नाही तर एक मोठा प्राणी आहे. खात्री होताच रांगेत उभ्या असलेल्यांनी तातडीने वन विभागाला फोन केला. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन बघितले तेव्हा महाकाय अजगर निवांत पहुडले असल्याचे लक्षात आले.
महाविद्यालयाच्या आवारात आढळलेले अजगर प्रचंड मोठे होते. हे अजगर पकडण्यासाठी वन विभागाच्या पाच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना भरपूर मेहनत करावी लागली. अखेर हुशारीने त्यांनी अजगर पकडले आणि नियंत्रणात आणले. नियंत्रणात आणल्यानंतर अजगराची लांबी मोजण्यात आली. त्यावेळी महाविद्यालयाच्या आवारात १५० फूट लांबीचे अजगर होते हे लक्षात आले. ही माहिती कानावर पडताच अनेकांची भीतीने गाळण उडाली. या महाकाय अजगराने ठरवले असते तर महाविद्यालयाच्या आवारातील किमान काही जणांना सहज गिळले असते, हा विचार करुनच अनेकांना घाम फुटला.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजगराला व्यवस्थित पकडल्यानंतर अनेकांनी त्या अजगराजवळ उभे राहून फोटो किंवा सेल्फी काढून घेतले. महाविद्यालयाच्या आवारात आढळलेले १५० फुटी अजगर हा चर्चेचा विषय झाले. एवढे महाकाय अजगर महाविद्यालयाच्या आवारात कुठुन आणि कसे आले हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
पावसाळ्यात अनेकदा आडोशाची सुरक्षित जागा शोधत सरपटणारे प्राणी अनपेक्षित ठिकाणी येण्याची शक्यता असते. दिसलेला प्रत्येक साप हा विषारी नसतो. यामुळे प्राण्यापासून सुरक्षित अंतर राखून तातडीने वन विभागाला माहिती देणे हाच या परिस्थितीतला सर्वोत्तम पर्याय आहे, असे वन विभागाने सांगितले.