वॉशिंग्टन: अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी जाहीर केलेल्या बक्षीसाची रक्कम दुप्पट केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आता मादुरो यांच्या अटकेची माहिती देणाऱ्यास ५० मिलियन डॉलर्स (सुमारे ४३८ कोटी रुपये) इतके बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मादुरो यांना जगातील सर्वात मोठा ड्रग्स तस्कर मानले जात असून, त्यांनी अमेरिकेत फेंटानिल-मिश्रित कोकेनचा पुरवठा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
https://prahaar.in/2025/08/08/india-in-action-mode-against-trumps-tariffs-arms-purchases-halted-defense-ministers-washington-visit-canceled/
२०२० पासून आरोप कायम, बक्षिसाची रक्कम केली दुप्पट
मादुरो यांच्यावर २०२० मध्ये पहिल्यांदा आरोप लावण्यात आले होते. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात न्यूयॉर्कमधील मॅनहटन येथील संघीय न्यायालयात नार्को-टेररिझम आणि कोकेन आयात करण्याच्या कटाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्यावर १५ मिलियन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर, माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कार्यकाळात ही रक्कम २५ मिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली. आता ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा ही रक्कम दुप्पट करून ५० मिलियन डॉलर्स केली आहे.
हे बक्षीस ओसामा बिन लादेनवर ठेवलेल्या बक्षिसापेक्षाही जास्त आहे, हे विशेष. ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली मादुरो न्यायापासून वाचू शकणार नाहीत आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळेल,’ असे ऍटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे व्हेनेझुएला आणि अमेरिकेमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.