मुंबई : आयुष्यात सर्व काही गमावलेली ती आणि प्रत्येक लढाई हरलेला तो यांच्या प्रेमकथेला आता हिरवा कंदिल मिळाला आहे. ‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडणार असून, येत्या १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा आकर्षक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिजीत यांनी ‘मुंबई लोकल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून, निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी हे निर्माते आहेत, तर त्र्यंबक डागा सहनिर्माते आहेत.
https://prahaar.in/2025/07/14/jannick-sinner-wins-wimbledon/
अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी प्रथमच एकत्र दिसणार असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे यांसारखे उत्तम कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांनी केले आहे, संपादन स्वप्नील जाधव यांनी तर विनोद शिंदे असोसिएट डिरेक्टर आहेत. डॉ. सुमित पाटील कला दिग्दर्शक आहेत. चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून, देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी व हर्षवर्धन वावरे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे, तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. निकुंज मालपाणी यांनी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम पाहिले आहे, तर राहुल ठोंबरे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
‘मुंबई लोकल’मध्ये एकमेकांना लोकलमध्ये पाहणाऱ्या दोन व्यक्तींची कथा केंद्रस्थानी आहे. दोघांचाही स्वतःचा संघर्ष आहे, परंतु लोकलमध्ये एकमेकांना पाहताना ते कसे एकत्र येतात आणि त्यांच्यात प्रेम कसे फुलते, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रेमाच्या नात्याप्रमाणेच चित्रपटाचा टीझरही हळुवारपणे उलगडत जातो, ज्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. ‘मुंबई लोकल’मध्ये फुलणारी ही प्रेमकथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आता १ ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.