Home ताज्या घडामोडी संपत्तीचे केंद्रीकरण धोकादायक

संपत्तीचे केंद्रीकरण धोकादायक

संपत्तीचे केंद्रीकरण धोकादायक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली चिंता

नागपूर : संपत्तीचे केंद्रीकरण धोकादायक असून विकेंद्रीकरणाची आवश्यकता आहे. संपत्ती काही श्रीमंतांच्या हातात केंद्रित होत असल्याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी गरीबांच्या वाढत्या संख्येचा उल्लेख करत देशातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे वास्तव मांडले.

गडकरी म्हणाले, हळूहळू गरिबांची संख्या वाढत आहे आणि संपत्ती काही मोजक्या श्रीमंतांच्या हातात केंद्रित होत आहे. हे रोखणे अत्यावश्यक आहे. अर्थव्यवस्थेचा विकास रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण भागाच्या विकासास चालना देणारा असावा. ते पुढे म्हणाले, आम्ही अशा आर्थिक पर्यायांचा विचार करत आहोत जे रोजगार निर्माण करतील आणि अर्थव्यवस्थेला गती देतील. संपत्तीचे विकेंद्रीकरण हे यामध्ये महत्त्वाचे पाऊल आहे.

गडकरी यांनी १९९१ साली भारताने स्वीकारलेल्या उदार आर्थिक धोरणांचा उल्लेख करत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे कौतुक केले. मात्र त्यांनी अनियंत्रित केंद्रीकरणाबद्दल इशाराही दिला. आपण याबाबत जागरूक राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

नितीन गडकरी यांनी नागपूरच्या व्यासपीठावरून देशाच्या आर्थिक आराखड्याचा बारकाईने वेध घेत एकीकडे संपत्तीचे केंद्रीकरण थांबवण्याची गरज मांडली, तर दुसरीकडे पायाभूत विकास, शेती आणि रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण भूमिका घेतली. त्यांच्या या वक्तव्यांमुळे आगामी आर्थिक धोरणांत दिशा-बदलाचे संकेत मिळत आहेत.