Home महाराष्ट्र झोपड्यांवर कारवाई… मग बंगलेवाल्यांना माफी कशी? सुजय विखेंचा थेट इशारा

झोपड्यांवर कारवाई… मग बंगलेवाल्यांना माफी कशी? सुजय विखेंचा थेट इशारा

झोपड्यांवर कारवाई… मग बंगलेवाल्यांना माफी कशी? सुजय विखेंचा थेट इशारा

शिर्डीतून सुरू राजकीय उकळत्या वातावरणाची नांदी

शिर्डी : शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिर्डीत अतिक्रमण कारवाईचे वादळ उठले आहे. पण या वादळात केवळ गरिबांच्या झोपड्याच उडणार का, की श्रीमंतांच्या बंगल्यांचेही उधळण होणार ? असा थेट सवाल माजी खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील यांनी करून स्थानिक कमर्शिअल कॉप्लेक्स आणि बंगल्यावाले नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

“गरिबांच्या अतिक्रमणावर हातोडा, मग बंगले आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सवर हात का नाही ? न्याय हा सगळ्यांना सारखाच असला पाहिजे, झोपडपट्टीतील माणसाला लागू तोच न्याय नगरसेवकाला लागू राहणार.या मोहिमेत कोणताही पक्षाचा, कोणताही मोठा नेता वाचणार नाही,” असा निर्वाणीचा इशारा देत सुजयदादांनी थेट सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवलं आहे.यावेळी डॉ.विखे पाटील यांनी अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेत असल्याचं जाहीर केलं.गट नं.१६१ मधील अर्ध्या गुंठ्याच्या जागेवर ७/१२ देण्यास सुरुवातही केली. परंतु या मोहिमेत ‘गरिबांचे पुनर्वसन होईल,पण श्रीमंतांची बेकायदेशीर दुकाने, बंगले आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स यांचं काय?’ असा सवाल उपस्थित करत त्यांनी थेट नगरपरिषदेतील काही गटांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. हे विधान केवळ अतिक्रमण धारकांसाठी नाही तर राजकीय पटावरील मोठ्या डावाची सुरुवात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निवडणुकीच्या तोंडावर हे वक्तव्य करून विखेंनी कुणाला अडचणीत आणायचा डाव साधला आहे का,याबाबत तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.शिर्डीतील अतिक्रमण कारवाईत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशा कोणत्याही पक्षाच्या लोकांना सवलत मिळणार नाही, असे डॉ विखेंनी स्पष्ट सांगितल्याने सत्ताधारी मंडळींची झोप उडाली आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘कसला न्याय आणि कोणासाठी’ या चर्चेला गावोगावी उधाण आलं आहे. एकीकडे गरिबांना ७ /१२ देण्याची सुरुवात करून विखे पाटलांनी त्यांच्या सामाजिक भानाची जाणीव करून दिली असली तरी श्रीमंत बंगल्यांच्या अतिक्रमणावर कुणी हात घालणार का ? याचे उत्तर नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांना द्यावे लागणार आहे.या मोहिमेत कोणता नगरसेवक, कोणता माजी नगराध्यक्ष, कोणता बांधकाम व्यावसायिक किंवा राजकीय पितळ उघडी पडते, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे. निवडणूक जवळ येत असल्याने विखेंच्या या शब्दांनी अनेकांचे धाबे दणाणले आहेत.सर्वसामान्य मतदार मात्र म्हणतोय “गरिबांची झोपडी हटवणं सोप्प आहे, पण बंगलेवाल्यांचं अतिक्रमण कधी काढणार?” डॉ. विखेंच्या वक्तव्याने राजकीय थरकाप उडवला असून निवडणूक पूर्व रणधुमाळीला झणझणीत सुरुवात झाली आहे.या मोहिमेची झळ कोणाला पोहोचते, कोणाचा मुखवटा गळतो, याची प्रचीती येत्या काही दिवसांत शिर्डीकरांना नक्कीच मिळेल.