डोळ्यात तेल घालून शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील वीर जवान संदीप पांडुरंग गायकरला गुरुवारी वीर मरण आले. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर बोकाळलेल्या पाकड्यांकडून अधून-मधून सीमेवर गोळीबार केला जात आहे. गुरुवारी पहाटे दहा भारतीय जवानांची तुकडी जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर तैनात होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना लढता लढता संदीप गायकर शहीद झाले.
संदीप गायकर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे रहिवासी होते. अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक म्हणून त्यांना ओळखले जात. भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात संदीप गायकर यांचे दोन सहकारीही गंभीर जखमी झाले. शत्रूशी दोन हात करताना भूमीपूत्र शहीद झाल्याने वृत्त गुरुवारी गावात धडकले. त्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली.
https://prahaar.in/2025/05/23/danger-of-accident-in-ahilyanagar-flex-hanging-on-electric-wires-administrations-negligence/
संदीप यांनी देशासाठी केलेला त्याग आणि दिलेलं बलिदान कायम प्रेरणादायी राहीलं, अशी भावना ब्राह्मणवाड्यातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर शुक्रवारी ब्राह्मणवाडा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.