Thursday, May 8, 2025
Homeदेशपाकिस्तानच्या गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात १३ ठार आणि ५९ जखमी

पाकिस्तानच्या गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात १३ ठार आणि ५९ जखमी

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतात सीमेजवळ असलेल्या गावांना लक्ष्य केले. पाकिस्तानने भारतात सीमेजवळ असलेल्या गावांच्या दिशेने गोळीबार आणि तोफगाळ्यांचा मारा सुरू केला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यात आतापर्यंत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५९ नागरिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी ४४ नागरिक जम्मू काश्मीरमधील पूँछ भागातले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यात ठार झालेले सर्व नागरिकही पूँछ भागातले आहेत.

पाकिस्तानच्या गोळीबार आणि तोफगाळ्यांचा माऱ्याबाबतची माहिती मिळताच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोव्हल यांच्याशी तातडीने चर्चा केली. यानंतर पंतप्रधान मोदी आणि वरिष्ठ मंत्री यांच्यातही चर्चा झाली. याआधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संसद ग्रंथालय इमारतीच्या समिती कक्ष जी – ०७४ नवी दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्रीही पंतप्रधान मोदींच्या सरकारी निवासस्थानी पोहोचले.

‘ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे’

ऑपरेशन सिंदूर अजून सुरू आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सर्वपक्षीय बैठकीत बोलले. त्यांनी ऑपरेशन सुरू असल्यामुळे जास्त माहिती देणे शक्य नाही, असे सांगत ७ मे रोजी कारवाईची थोडक्यात माहिती दिली. बुधवार ७ मे रोजी केलेल्या कारवाईत किमान १०० अतिरेकी ठार झाल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

फिरोजपूरमध्ये घुसखोर ठार

भारतात पंजाबमधील फिरोजपूरमध्ये सुरक्षा पथकाने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले. हा घुसखोर भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होता, असे सुरक्षा पथकांनी सांगितले.

बिहारमध्ये चार चिनी नागरिकांना अटक

भारत – पाकिस्तान तणाव वाढला असतानाच बिहारमध्ये सुरक्षा पथकांनी चार चिनी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्या चिनी नागरिकांची चौकशी सुरू आहे.

पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात गुरुवार ८ मे रोजी रात्री नऊ वाजल्यापासून ते शुक्रवार ९ मे रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत असा रात्रभर ब्लॅकआऊट असेल. या ब्लॅकआऊटची घोषणा प्रशासनाने थोड्या वेळापूर्वीच केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -