Thursday, May 8, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यकोकणचा रानमेवा हरवतोय...!

कोकणचा रानमेवा हरवतोय…!

माझे कोकण : संतोष वायंगणकर

कोकणात आंबा, फणस, कोकम, जांभुळ, करवंद असं सर्वकाही आहे. यामुळेच कोकणात एप्रिल, मे महिन्यात उष्णता वाढलेली असते. वातावरणात उष्णता असतानाही कोकणवासीय शहरातील चाकरमानी तर गावाकडे येतातच; परंतु कोकणात उष्णता असतानाही देशभरातील पर्यटक कोकणात येतात. कोकणातील समुद्रकिनारे कोकणातील खाद्यसंस्कृती, पर्यटनस्थळ, मंदिर या सर्वांच आकर्षण पर्यटकांना आहे आणि याबरोबरच कोकणचा रानमेवा हे देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. गेल्याकाही वर्षात हवामानात सतत बदल घडत आहेत. या हवामानातील बदलाचा परिणाम कृषी क्षेत्रातील सर्वच घटकांवर होत आहे. यावर्षी वारंवार येणाऱ्या अवकाळी पावसाने आणि वाढलेल्या उष्णतेने कोकणातील आंबा, काजू, कोकम, जांभुळ, करवंद अशा सर्वच फळपिकांवर याचा परिणाम जाणवू लागला आहे. आंबा, काजू, मासे यावर कोकणचे अर्थकारण अवलंबून आहे. त्याची होणारी आर्थिक उलाढाल मोठी होईल तेव्हा फळबागायतदाराच्या हातात पैसा येईल; परंतु हवामानाच्या अनियमिततेमुळे सारेच गणित बिघडून जाते.

आंबा, काजू या फळावर तर हवामानाचा फार मोठा परिणाम होतो. काजू ‘बी’चा यावर्षीचा दर सर्वसाधारणपणे स्थिर होता. थोडाफार त्यात बदल होत राहिला; परंतु आंब्याच्या दरात घसरण होत राहिली. मध्येच उष्णता वाढल्याने काजू, आंबा ही फळ लवकर तयार झाली. पाऊस पडल्याने या फळांवर काळे डागही पडले. सहाजिकच ही डागी फळ म्हणून त्याला दरही कमी मिळाला. त्याचबरोबर झाडावर आंबे अलिकडे कुठे दिसतही नाहीत. रायवळ आंबा पूर्वी कोकणात विपुल प्रमाणात होता. पूर्वीच्या कोकणातील पिढ्या या रायवळ आंबा, फणस, जांभुळ यावरच जगल्या आहेत. सर्वसाधारणपणे जानेवारी ते जून अशा सहा महिन्यात कोकणात तयार होणारी फळ कुटुंबांचा उदरनिर्वाह सांभाळत होती. फणस तयार झाले की फणसाची कुवरीची भाजी, कच्चा फणस त्याची भाजी, फणसाचे गरे, जांभुळ, करवंद असं सार पौष्टिक नैसर्गिक खाद्य कोकणात होत. कोकणात गावो-गावी गरीबीच होती. दोनवेळच जेवण मिळण मुश्किल होत. हातात पैसा नव्हता परंतु कोकणातील रानमेव्याची अफाट श्रीमंती होती. या श्रीमंतीनेच कोकणातील शेतकऱ्याला, सर्वसामान्य माणसांना फार मोठा आधार दिला आहे. पावसाळी हंगामातही कोकणातील शेतकरी रानभाज्यांवर गुजरान करायचा. या खाण्यामध्ये कोणतीही भेसळ नव्हती. जे काही खायच ते शंभर टक्के निसर्गाने दिलेलं त्यावर पोसलेल खाद्य होत. रायवळ आंबा आणि हा रायवळ आंबा खाण्यातली मजा काही औरच होती. रायवळ आंबा त्याची चव थोडासा मिरमिरीतपणा तो खाताना तो चोखून खावा लागतो. खाताना त्याचा रस हातावर ओघळत येणार ठरलेलच. जर हाताच्या कोपरापर्यंत रायवळ आंब्याचा रस ओघळत आला नाही तर त्याची मजाच येणार नाही. दुसऱ्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर दगड मारून पाडलेला आंबा जेव्हा आपण खातो तेव्हा एक आंबा पाडण्याचा जो भीम पराक्रम आपण करतो तो अविर्भाव काही औरच असतो.

शेतात फिरणे, आंबे पाडणे हे सार आज पन्नाशी, साठी पार केलेल्यांनी अनुभवल आहे. रायवळ कच्चा आंबा त्याला मालवणीत तोर म्हणतात. या आंब्याला तिखट मिठ लावून खाण म्हणजे स्वर्ग सुखच म्हणावं लागेल. हेळू, आटक, निव, करवंद, जांभुळ हे तर कॉमनच आहेत. काटेरी झाडावरची करवंद काढणं हे देखील जिकरीचे काम. डोंगरातील ही काळी मैना रानात पूर्वी अनेक ठिकाणी पहावयास मिळायची. या करवंदांच्या जाळीवर शालेय जीवनात अनेकजण तुटून पडायचे. काटेरी जाळीतील करवंद काढतानाही आज आणि तेव्हाही चांगलीच कसरत होत असते. परंतु डोंगरातली ही काळी मैना एकदा खायला सुरूवात केली की ती आणखीन खावीशी वाटतात; परंतु अलीकडे अनेक भागातील करवंदाच्या जाळी नविन बदलामध्ये कुठे दिसत नाहीत. करवंदांच्या जाळीखाली बहुतांशवेळा आपणाला मातीची पेडं दिसते. त्या वारूळात सापाच वास्तव्य असत असही बऱ्याचवेळा म्हटलं जातं. मग त्याच्याही फार चवीने रंगवलेल्या कहाण्या वर्षानुवर्षे कोकणातील गावो-गावी ऐकायला मिळतील. जाळीत करंदा काढूक गेलय आणि सापाने फना कशी काढल्याना ती फना बघून करंदाचो खोलो (पानाच्या) टाकून कसे पळालव या सुरस कथा अनेक गावातून चर्चिल्या जातात. कोकणातील ग्रामीण भागातील हॉटेलात चहा-भजी खाताना या सगळ्या गजालीत कोकणी माणूस रमलेला असतो. कोकणातील जांभुळ देखील प्रसिद्ध आहेच. मधुमेहींसाठी जांभुळ या फळाने विशेष करून गेल्याकाही वर्षात मान मिळवला आहे. सोन्याच्या भावात जाऊन मान मिळवला आहे. जांभुळ देखील अलिकडे फारच कमी प्रमाणात उत्पादित होत आहे. कोकणातील जांभुळ त्याच्या बिया औषधी म्हणून वापरतात. एकेकाळी ज्या जांभळाला फारस कोणी विचारत नव्हत. आज त्याच जांभळाच्या झाडांवरील जांभळाचा लिलाव होतो. इतक महत्त्व आलय. पिकही फार कमी येत त्यामुळे या जांभळाच दर्शनही कोकणातील स्थानिक बाजारपेठांमधून होताना दिसत नाही. पूर्वी टोपलीभर जांभळ बाजारात विक्रिला यायची; परंतु आज-काल दररोज जांभुळ मुंबई, पुणे, नागपूरच्या बाजारात जातात. मुंबईतील दादर मार्केटमध्ये महाराष्ट्रातील इतर भागातून आणि इतर राज्यातूनही जांभुळ येतात; परंतु पहिला मान आणि मागणी कोकणातील जांभुळालाच आहे.

रतांबाही अलीकडे फारच कमी होत चाललाय. या रतांब्याला यावर्षी प्रचंड मागणी आणि चांगला दरही आहे. परंतु रतांब्याची नव्याने फार लागवड होत नाही. रतांब्याची लागवड फार कीरकोळ प्रमाणात झाली आहे. रतांब्याचा उपयोग औषधांपासून रंगापर्यंत सर्वच बाबतीत होत आहे. त्याला चांगला दरही आहे. पूर्वी ज्या रतांब्याला दोन-तीन रुपये किलोने कोणी विचारत नव्हते. तोच रतांबा यावर्षी अडीचशे-तिनशे रूपये किलोने विकला जातोय. कोकणातील आंबा, काजूच जस नवनवीन संशोधन झालय तसच कोकणातील हा सारा रानमेवा आपण जपला पाहिजे. यातच कोकणपण टिकून राहू शकेल. रानमेवा हरवता कामा नये. खरी ती देखील कोकणची ओळख त्याची स्वादिष्टता आपले वेगळेपण सिद्ध करणारी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -