Thursday, May 8, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेपर्यटकांच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थाने शांती मिळाली; डोंबिवलीतील कुटुंबीयांनी मानले भारतीय लष्कराचे आभार

पर्यटकांच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थाने शांती मिळाली; डोंबिवलीतील कुटुंबीयांनी मानले भारतीय लष्कराचे आभार

ठाणे : भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या डोंबिवली येथील पर्यटक हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या २६ मृत पर्यटकांच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थाने शांती मिळाली,” अशी प्रतिक्रिया हेमंत जोशी यांचे नातेवाईक जयंत भावे यांनी प्रसारमाध्यमांना बुधवारी दिली.

https://prahaar.in/2025/05/07/operation-sindoor-on-social-media-after-operation-sindoor-dharmo-rakshati-rakshitah-became-a-trend-what-is-the-meaning-of-this-verse-find-out/

या कारवाईने आम्ही समाधानी झालो

जयंत भावे म्हणाले की, “पहलगाम हल्ल्यानंतर विश्वास बसणार नाही, असे सडेतोड प्रत्त्युत्तर आम्ही आमच्या शत्रूंना देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्याचवेळी भारत सरकार पहलगाम हल्ल्याचा लवकरच बदला घेईल, असा विश्वास आम्हाला होता. या हल्ल्याची आम्ही वाट पाहतच होतो. अखेर ठरल्याप्रमाणे झाले.

भारत सरकार आणि लष्कराने कठोर पावले उचलत पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईने आम्ही समाधानी झालो आहोत. मृत पर्यटकांच्या आत्म्याला या हल्ल्याने शांती मिळाली. असे हल्ले करून दहशतवाद कायमचा संपुष्टात आणला पाहिजे. म्हणजे पुन्हा दहशतवाद्यांची अशी क्रूर कृत्ये करण्याची हिम्मत होणार नाही,” असे हल्ल्यातील मृत पर्यटक हेमंत जोशी यांचे नातेवाईक जयंत भावे यांनी सांगितले.

भारतीय लष्काराचा अभिमान वाटतो

दुसरीकडे, अतुल मोने यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. “पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा भारताने अल्पावधीत बदला घेतला. दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले. यात दहशतवादी मारले गेले. लष्कराच्या या सिंदूर विशेष मोहिमेबद्दल आम्हाला भारत सरकार आणि भारतीय लष्काराचा अभिमान वाटतो. या कारवाईमुळे आम्ही खूप समाधानी आहोत. गेलेला माणूस परत येत नाही, याबद्दल दु:ख आहेच. पर्यटकांच्या बलिदानाला अशाप्रकारच्या कारवाईतून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्यात आली.

दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईपर्यंत अशाप्रकारच्या कारवाया लष्कराने सुरूच ठेवल्या पाहिजेत. दहशतवाद्यांनी केवळ पर्यटकांवर नव्हे तर भारत देशावर हल्ला केला होता. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखविणे योग्य होते. लष्कराच्या या विशेष मोहिम कारवाईत आता पुन्हा राजकारण करू नये,” अशी प्रतिक्रिया अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -