Thursday, May 8, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यबी. वाय. पाध्ये पब्लिसिटी...

बी. वाय. पाध्ये पब्लिसिटी…

सेवाव्रती – शिबानी जोशी

आ पण १४ कला आणि ६४ विद्या मानतो. पण आजकाल नव्याने निर्माण झालेली  ६५ वी कला म्हणून   जाहिरात क्षेत्राकडे बघितले जाते. पूर्वी एकमेकांना आपले अनुभव सांगून   उत्पादनाची खरेदी विक्री होत असे; परंतु आजच्या बदलत्या, गतिमान जीवनमानामुळे एखादंे उत्पादन क्षणार्धात लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल दुसरा मार्ग नाही. पूर्वीच्या काळी जाहिरात पोहोचवण्याची माध्यमच नव्हती. त्यामुळे ज्या वेळेपासून हे माध्यम हातात आले त्यानंतर जाहिरात क्षेत्र प्रचंड विस्तारले. आज अनेक कंपन्या अशा आहेत की, केवळ एका जाहिरातीमुळे त्या जगत् मान्य होऊन त्यांच्या विक्रीमध्ये प्रचंड मोठी उलाढाल झाली आहे. ‘निरमा’ सारखी वॉशिंग पावडर एका जाहिरातीमुळे भारतभर प्रसिद्ध झाली.  घरगुती   पावडर बनवणारा छोटासा व्यवसाय देशातला टॉप ब्रँड बनला. ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे!’ या जाहिरातीमुळेही कालनिर्णय घराघरांच्या भिंतीवर पोहोचले. आपल्या देशात दीड दोनशे वर्षांपूर्वी वृत्तपत्र आली. त्यानंतर आकाशवाणी, त्यानंतर दूरदर्शन आणि आता आलेला सोशल मीडिया त्यामुळे उत्पादनांच्या जाहिराती सर्व दूर पोहोचू लागल्या आहेत. काळाप्रमाणे चालत नवीन आलेल्या माध्यमांशी गट्टी करत मुंबईतील मराठी माणसाची जाहिरात वितरण संस्था यशस्वी वाटचाल करत आहे. ती कंपनी आहे बी वाय पाध्ये पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड.

प्रेस, रेडिओ, टीव्ही, मीडिया जाहिरातींमध्ये एक ब्रँडनेम झालेल्या बी वाय  पाध्ये यांनी अलीकडेच आपले सहासष्टावे वर्ष साजरे केले आहे. बीवायपी नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी, नवीन क्षितिजे ओलांडण्यासाठी नवीन योजना, नवीन उत्साह आणि नवीन ताकदीसह पुढे जात असते. संपूर्ण भारतातील सर्व भाषेतील वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध करतात व उत्पादनांसाठी योग्य माध्यम निवडण्यासाठी मार्गदर्शन करतात. १९५९ साली बाळकृष्ण यज्ञेश्वर, उर्फ दादा पाध्ये यांनी त्यांच्या आद्याक्षरांसह एक प्रोप्रायटरी कन्सर्न स्थापन केली. BYP अक्षरशः दुसऱ्या मजल्यावरील घरातून चालवले जात असे. दादा मार्केटिंग आणि ग्राहक संबंध पाहत असत आणि त्यांची मेहुणी ‘जयंती जोशी’ अकाउंट व उर्वरित काळजी घेत असत. दादा पाध्ये हे एका वृत्तपत्रात काम करत होते; परंतु त्या वृत्तपत्राच्या गुजराती मालकाने मालक, युनियन बेबनावात एक दिवस अचानक वृत्तपत्र बंद केले आणि दादांवर बेरोजगारीची वेळ आली. वृत्तपत्रात काम करत असल्यामुळे विविध लोकांशी त्यांच्या ओळखी होत्या. तिकडे येत असलेल्या जाहिरातीही ते पाहत असत त्यामुळे आपणच आपली जाहिरात एजन्सी का सुरू करू नये? असं त्यांना वाटलं आणि घरातूनच त्यानी हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला वृत्तपत्रांना जाहिराती पाठवायच्या आणि त्यावर कमिशन मिळायचे नंतर व्यवसाय वाढत असताना प्रोप्रायटरी कन्सर्नचे भागीदारी फर्ममध्ये रूपांतर झाले. दादांचे पुत्र विजय, दिलीप आणि श्रीराम हे व्यवसायात सामील झाले. आज ५ कर्मचारी सदस्य, २ व्यवस्थापक आणि ५ बोर्ड संचालकांसह, बी वाय पाध्ये पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड ४५० हून अधिक  कंपन्या, ग्राहकांना सेवा देत आहे.

BYP हे आता जाहिरात क्षेत्रात ब्रँड नेम झालं आहे. आपल्या ग्राहकांना फक्त त्वरित आणि परिपूर्ण सेवा देण्यावर विश्वास ठेवत नाही, तर  क्लायंटला   प्रदान केलेल्या सेवेचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल.  याकडे ते लक्ष देत असतात. फक्त जाहिरात करून ती माध्यमात प्रकाशित केली की आपलं काम झालं असं ते मानत नाहीत, तर त्या उत्पादकाची विक्री किती वाढत आहे, जाहिरात त्यांना कशी उपयोगी पडत आहे यावरही ते लक्ष ठेवून असतात आणि त्यानुसार सल्ला ते त्या कंपन्यांना देतात. असे केल्याने,  क्लायंटचा   मीडिया प्लॅन तयार करण्यात मदत होत असते.   ते पैशापेक्षा नैतिकता, कमिशनपेक्षा ग्राहक आणि गुणोत्तरांपेक्षा संबंधांना प्राधान्य देत आले आहेत. त्यामुळेच त्यांचे सर्व क्लाएंटशी व्यक्तिगत संबंध निर्माण झाले आहेत आणि वर्षानुवर्ष ते क्लाइंट त्यांच्याकडे जहिराती करत आहेत.

अंजली किचनवेअर्स, कालनिर्णय, खो गो, केसरी टुर्स, कोहिनूर ग्रुप, सचिन ट्रॅव्हल, चितारी ट्रॅव्हल, केशरंजना, राज ऑइल, वैद्य पाटणकर काढा, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, रंगोली, अनुली, पानेरी, पां. ह. वैद्य, एम्.व्ही. पेंडुरकर, व्ही. एस्. मालंडकर, ज. गं. पेडणेकर, विक्रम ज्युवेलर्स, स्टीलमॅन, मामा काणे, आदर्श, आस्वाद, शकुंतला हेअर ऑइल, महाराष्ट्र व्यापारी पेठ ,चांदेरकर स्वीट इत्यादी ब्रँड आणि ५०० हून अधिक मराठी नावाजलेली नाटकांच्या सर्वांच्या लोकप्रियतेमध्ये आमचा ‘बीवायपी’ चा खारीचा वाटा आहे. या सर्वांच्या वर्तमानपत्र, रेडिओ आंणि दूरदर्शन, प्रादेशिक वाहिन्यांवर जाहिराती करून त्यांचा ब्रँड लोकप्रिय करता करता आमचाही ‘बीवायपी’ हा ब्रँड म्हणून लोकप्रिय झाला, असे विजय पाध्ये सांगतात.त्यांच्या क्लायंटची यादी बघितली तर आपल्याला दिसून येईल की  , कोणत्याही जाहिरात कंपनीकडे इतक्या मराठी नाटकाच्या जाहिराती नसतील, जवळपास ७५ टक्के मराठी नाटकांच्या जाहिराती बी वाय पाध्येच करतात. १९९० मध्ये, “कळत नकळत”” या मराठी चित्रपटासाठी बीवायपीला रापा कडून सर्वोत्कृष्ट रेडिओ कार्यक्रम आणि स्पॉटचा पुरस्कार मिळाला होता तसंच १९९९ मध्ये बीवायपीला   नंदी ब्रँड अगरबत्ती साठीचा सर्वोत्कृष्ट हिंदी स्पॉटसाठी आणखी एक पुरस्कार मिळाला होता. दादा ( बी वाय) पाध्ये यांनी वृत्तपत्रातील जाहिराती पासून धंद्याला सुरुवात केली; परंतु नंतर माध्यम ही वाढत होती. नवी पिढी धंद्यात उतरल्यानंतर सुरुवातीला आकाशवाणीवरील असंख्य रेडिओ स्पॉट, त्यानंतर दूरदर्शनवर जाहिराती बनवून देणे, तसेच त्या प्रसारित करण्याचं काम पाध्ये पब्लिसिटीकडून होऊ लागलं आणि आता ते जोमाने सुरू आहे.

जाहिरात क्षेत्र हे अत्यंत क्रिएटिव्ह किंवा सृजनशील क्षेत्र आहे. ग्राहकांची आवड आणि नस ओळखून अनेक चांगल्या चांगल्या कलाकारांना लेखनाचं तसेच डबिंगच काम ते नेहमीच देतात. सुरुवातीच्या काळात आकाशवाणीवरील बाळ कुडतरकर, अमीन सयानी यांच्यासारख्या दिग्गजानी आपल्याला खूप सहकार्य केलं, तसंच दूरदर्शनच्या जाहिरातींसाठी विनय आपटे, विवेक आपटे अजित भुरे, स्वाती सुब्रमण्यम सारख्या क्रिएटिव्ह लोकांनी खूप मार्गदर्शन केलं असं विजय आवर्जून सांगतात. विजय पाध्ये जेव्हा या धंद्यात उतरले तेव्हा त्यांना रेडिओ, टीव्हीची काहीच माहिती नव्हती परंतु जाहिरात क्षेत्रातल्या या सर्व दिग्गजांकडून शिकत आपण काम केलं त्यामुळेच यशस्वी झालो आहोत असे त्यांचें ऋण विजय नेहमी मानतात. जाहिराती अतिशयोक्तीने करतात असं म्हटलं जाते. त्याबद्दल विजय पाध्ये म्हणाले की, जाहिरात म्हणजे स्वप्न दाखवणं असत. दीपिका पदुकोण एका मोठ्या बाथरूममध्ये लक्स साबणाने आंघोळ करत आहे. हे दिसलं तर आपली आवडत्या नटी सारखं आपलं बाथरूम नसेल, पण आपण लक्स   साबण तर लावू शकतो. म्हणून तो घेतला जातो; परंतु अमजद खानने मी ही बिस्कीटं खातो असं सांगितलं. पण ती जाहिरात लोकांना आवडली नाही. कारण लहान मुलं गब्बरला (अमजद खान)  घाबरत होती. त्यामुळे हे पथ्य आम्ही नेहमी पाळत आलो आहोत.

तरुण मुलांना आपण काय सल्ला द्याल? त्यावर विजय पाध्ये  म्हणाले की, या क्षेत्रात खूप मोठा स्कोप आहे. अनेक माध्यम आली आहेत. क्रिएटिव्ह, पीआर, माध्यमिक क्षेत्र अशा अनेक बाबीतून यात काम मिळू शकत. त्यामुळे मुलांनी या क्षेत्रात जरूर यावं. बी वाय पाध्येंची आता तिसरी पिढी यात उतरली आहे आणि माध्यम वाढत आहेत. तसा त्यांच्या कामाचा आलेख ही वाढत आहे.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -