Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमातृत्वाला सलाम

मातृत्वाला सलाम

स्नेहधारा – पूनम राणे

ईश्वराला प्रत्येक जागी जाता येत नाही, म्हणून त्यांने स्त्रीला मातृत्व बहाल केले. मातृत्वाची कसोटी पार करताना काही भाग्यवान स्त्रियांनाच अनेक दिव्यातून जावे लागते. प्रयत्न आणि प्रयास यामुळे अशक्य गोष्ट साध्य होऊ शकते आणि या स्त्रियांच्या हातूनच सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात घडू शकते. इतरांच्या दुःखावर हलकेच फुंकर मारून त्या प्रसंगातून तरण्याचे बळ अनेक मातांना मिळत असते. आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी या जोरावर आपल्या पोटी जन्माला आलेल्या विशेष मुलांचा आपण सांभाळ करू शकतो, देव आणि दैवाला दोष न देता, सकारात्मक दृष्टीने अशी विशेष मुले आपल्या पदरी जन्माला घालून परमेश्वराची माझ्यावर कृपा आहे असे म्हणणाऱ्या वंदना कर्वे यांचीही कहाणी. मातृत्व हवहवसं वाटणारं! ईश्वरी कृपेने आपल्या पोटी झालेला नवीन आत्म्याचा अविष्कार. माता स्वतःचा मान जाणत नाही, ती जाणते फक्त माया.

बाळाला कसे वाढवावे याचे स्वप्न मनात घेऊन नऊ महिने अत्यंत आनंदात असणाऱ्या या मातेला नऊ महिने होताच बाळाचा जन्म झाला. बोलके डोळे, अत्यंत गोंडस, देखणी सुंदर बाहुली जणू! तिचे नाव वसुधा ठेवले.
जन्मानंतर तीन महिन्यांनी ती प्रचंड आजारी पडली. तिला जुलाब झाले. डॉक्टरकडे तातडीने घेऊन गेले; परंतु चुकीच्या औषधांमुळे विष निर्माण झाले आणि डोक्यात मेंदूपर्यंत गेले. ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला गॅस्ट्रोचा अटॅक आला. वारंवार फिट्स यायला लागल्या. हवेतील जंतूमुळे गॅस्ट्रो झाला. गॅस्ट्रोमुळे डी-हायड्रेशन आणि त्यातून मग एन्कॅफेलाइटिस आजार. हा आजार लाखात एकाला होतो. पूर्वी या आजारावर औषधम नव्हते. भारतातील ही तिसरी केस होती. तरीही माता डगमगली नाही. मोठ्या धीराने त्यांनी आपल्या लेकीला सांभाळण्याचा प्रयत्न केला. काही गमतीशीर खोड्या ती करत असे. आजोबांनी तिला कडेवर घेतले तेव्हा, त्यांच्या मिश्या ओढणे, शर्टाच्या कॉलर चावणे, लोकांवर दूध उडवणे, बाटलीचे बुच उडवणे, अंगावर दूध उपडी करणे, वस्तू फेकून मारणे असे वेगवेगळे उद्योग ती करत असे.

मुलांना मारून शिस्त लावण्यापेक्षा त्यांच्या कलाने घेतल्यास ती अधिक चांगली निपजतात. या विश्वासानेच त्या वसुधावर तिच्या कलेने घेऊन तिच्याशी वागण्याचा प्रयत्न करत होत्या. विविध प्रयोगही तिच्यासोबत करून पाहत होत्या. हातात चिकन माती देऊन हाताना बळकटी आणण्याचा प्रयत्न करत होत्या. तिला आंघोळ घालताना नेहमी तिच्यासोबत एक खेळण्यातली बाहुली ठेवून पहिला तांब्या बाहुलीवर आणि नंतरचा तांब्या वसुधावर घालून एक तांब्या वसुधाचा, एक तांब्या बाहुलीचा असे शिकवत होत्या. या खेळातून ती आंघोळ करायला शिकत होती. हळूहळू हातपाय धुणे, पाण्यात खेळणे या गोष्टींची तिला मजा येत होती.

नित्यनेमाने वेळ काढून बागेत, समुद्रकिनारी फिरायला घेऊन जात असत. केव्हा केव्हा ती लोकांच्या अंगावर वाळू उडवत असे. कुणाच्या घरी घेऊन गेले तर त्यांच्या घरी असणारे कागद घेऊन फाडत बसे. तिच्या वागण्यामुळे काही प्रसंगी शेजारीही दुरावले होते. बागेत फिरवायला गेल्यानंतर तिथे विमान, फुगा, पतंग, बॉल असे वेगवेगळे शब्द तिच्यासोबत बोलून घेत असत. महानगरपालिकेच्या मंदबुद्धी मुलांसाठी असलेल्या शाळेत तिचे नाव दाखल केले. तिथे असणाऱ्या तृप्ती ओझे नावाच्या बाई तिची प्रगती करून घेत होत्या. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. एक ते एक हजार अंक, दोन ते पंधरा पाढे, मराठी इंग्रजी महिने, बेरीज, वजाबाकी तिला येऊ लागली. फळाफुलांची नावे सांगू लागली. मात्र या शाळेत केवळ अठरा वर्षांपर्यंतच प्रवेश होता. त्यानंतर काय करावे? वंदना कर्वे मॅडम यांनी अशाच प्रकारच्या मुलांच्या पालकांना एकत्र करून १९८६ साली “आव्हान पालक संघ” स्थापन केला.

या पालक संघामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. भाजण्या तयार करणे, पीठ करणे, हार तयार करणे, मोत्या-फुलांची तोरणे तयार करणे, गणपती, राख्या, दिवाळी ग्रीटिंग्स, पणत्या, गुढीपाडव्याच्या गुढ्या या प्रकारच्या शोभेच्या वस्तू तयार करून त्या विविध प्रदर्शनात मांडल्या जातात. लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आणि त्यातून येणारा पैसा या मुलींच्या नावावर ठेवला जातो.

पालक आणि मुलांच्या विरंगुळ्यांचे, मनोरंजनाचे आर्थिक साधनांचे ठिकाण म्हणून पालक संघाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. या पालक संघाला भेट देण्याचा योग माझ्या शाळेच्या विद्यार्थिनींना आला. विद्यार्थिनीने घेतलेल्या मुलाखतीतून पालक संघात येणाऱ्या मुलांसाठी घेत असलेल्या परिश्रमाची जाणीव झाली. सामाजिक मातृत्वाची जाण असणाऱ्या वंदना कर्वे यांच्या कार्याला सलाम!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -