Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिककोलाजभावंडांची भांडणं

भावंडांची भांडणं

आनंदी पालकत्व – डाॅ. स्वाती गानू

पण पाहत असतो की आत्ता तर दोघं भावंडं छान खेळत होती, त्यांचा आवडता टीव्ही. शो आनंदाने पाहत होती. मनातल्या मनात तुम्ही म्हणत असता की “चला आजचा दिवस शांततेत गेला” आणि अचानक पुढच्या क्षणी तुम्हाला आरडाओरडा करण्याचा आवाज येतो. भावंडं आपापसात भांडायला लागलेली असतात. कदाचित मारामारीही सुरू झालेली असते. त्या दोघांच्या भांडणात हस्तक्षेप करू नये किंवा त्यांनी त्यांचं भांडण स्वतः सोडवावे असे तुमच्या मनात येते. पण तो विचार तुमच्या मनाला पटत नाही योग्य वाटत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या की, मुलांच्या भांडणात आपण हस्तक्षेप करणं किंवा त्यांना त्यांची भांडणं स्वतः सोडवून देणे या दोन्हीपैकी कोणत्याही एका पर्यायाला चिकटून राहणे योग्य नाही. जर तुम्ही त्यांची भांडणं सोडवायला लागलात, तर मुलं आपले प्रॉब्लेम्स स्वतः सोडवू शकणार नाहीत. प्रश्न कसे सोडवावे हे ते कधी शिकू शकणार नाहीत आणि जर तुम्ही मुलांच्या भांडणात हस्तक्षेप न करता लांब राहिलात, तर दोनपैकी एक भावंडं परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्याला त्रास देईल. म्हणून या दोन्ही पर्यायाचा समतोल साधणं हीच भावंडांमधील भांडणं सोडवण्याची गुरुकिल्ली आहे. पण हे प्रभावीपणे करायचं तरी कसे?

…तर आधी समजून घेऊया की भावंडांमध्ये भांडणं का होतात?

भावंडांमधील भांडणं ही तर एक नैसर्गिक बाब आहे. भांडणाला कारण थोडंच लागतं. कोणत्याही गोष्टींसाठी ते भांडू शकतात. सगळ्यात मोठे कारण असते ते म्हणजे भावंडांमध्ये सारखी स्पर्धा सुरू असते. अभ्यास, कपडे, खाणं, खेळ. खरं म्हणजे कोणत्याही गोष्टीवरून ते भांडू शकतात. अगदी आई-वडिलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही मुलं भावंडांशी भांडतात. अशावेळी आपला तोल सुटू शकतो आणि मग त्या रागात आपण मुलांशी नीट वागत नाही.

या भांडणांकडे बघण्याचा एक मजेदार अँगल हाही आहे की, मुलं जेव्हा भांडतात तेव्हा वाद घालतात, बोलण्यातून एकमेकांवर कुरघोडी करतात त्यातून त्यांचं भाषेवरच प्रभुत्व वाढतं, ते आपले मुद्दे प्रभावीपणे मांडतात आणि दुसऱ्यांचे न पटणारे मुद्दे खोडून ही काढू शकतात. असं असलं तरी मुलांनी भांडू नये. एकमेकांचा दुस्वास करू नये. वादविवाद, भांडणांमुळे मुलांच्या नात्यात कटुता येऊ नये. घरातील वातावरण अशांत होऊ नये अशीच प्रत्येक पालकाची अपेक्षा असते म्हणूनच आपल्या मुलांना आपापसातील, भावंडांमधील भांडणं कशी सोडवावी हे शिकवायलाच हवं.

मुलांची भांडणं कशी सांभाळायची, हॅन्डल कशी करायची ते आता पाहू या.

१. भांडणांचं नेमकं मूळ जाणून घ्या.
२. दरवेळेस मुलं वस्तू, मिळणाऱ्या सुखसोयी यावरूनच भांडत असतात नाहीतर बहुतेक वेळेला त्यांचा जन्मक्रम आणि फॅमिली डायनॅमिक्स ही कारणंही असू शकतात.
३. कुटुंबात पहिल्यांदा जन्माला आलेल्या मुलाचे लाड जास्त होतात. त्याला पालकांकडून जास्त सुविधा, सुरक्षितता, कौतुक मिळतं.
४. मुलांच्या भांडणाचे मूळ आपापसातील स्पर्धा असली तरी प्रत्येकवेळी स्पर्धा नकारात्मक नसते. मात्र भावंडांच्या बाबतीत त्यांचे एकमेकांशी असलेले नाते खराब होऊ शकते. असे का? कारण जर ती तुलना फार काळ चालत राहिली, तर त्याचा परिणाम वाईट होईल.
५. मोठ्या माणसांत जर शत्रुत्व असेल, तर त्याचाही परिणाम मुलांवर होत असतो .
६. पालकांनो, भावंडांत भांडणं होतात तेव्हा शांत राहा, डोकंही शांत ठेवा. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. मुलं काय करताहेत यावर लक्ष ठेवल्याने परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. तुम्ही शांतपणे भांडणं हाताळता हे पाहून मुलंही अगदी तशीच वागतील.
७. घरात सगळ्यांनी एकमेकांना मदत करावी, परस्पर सहकार्य करावे असे वातावरण ठेवा.
८. मुलांची तुलना करणे टाळा, एकापेक्षा दुसऱ्याला जास्त फेवर करू नका. याउलट त्यांनी एकत्र खेळणे, एकमेकांबरोबर वेळ घालवणे या गोष्टीला प्रोत्साहन द्या.
९. आपले पालक एकमेकांशी कसं वागतात याचं उदाहरण मुलांसाठी आदर्श म्हणून जर तुम्ही घालून दिलतं तर मुलंही त्यातून शिकतात.
१०. तुम्ही दार आपटणं, आरडाओरडा करणं हे जर मुलांनी पाहिलं तर मुलंही भांडण सोडवताना याच मार्गाचा वापर करतील.
११. मुलांबरोबर जास्तीतजास्त वेळ घालवा आणि त्यांना समजावून सांगा की भांडणं झाली तर थोडा वेळ पॉज घ्यायचा असतो म्हणजे तुम्ही शांत व्हाल आणि भांडणं सोडवता येतील .
१२. कुटुंबातील सगळेजण एकत्र बसून बेसिक नियम ठरवून घ्या. कोणीही कुणाचे मन दुखावेल असे शब्द वापरायचे नाहीत. समोरचा बोलत असताना मधेमधे बोलायचे नाही. आरडाओरडा नकोच. आपण सुजाण नागरिक आहोत हे मुलांना समजावून सांगा.
१३. प्रत्येकाला बोलण्याची, आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्या. मुलांना घडलेल्या प्रसंगाबद्दलचा स्वतःचा दृष्टिकोन मांडू द्या. त्यांना काय वाटतं ? मुलांना त्या प्रॉब्लेमना नाव देऊ दे. विचार करू दे. जेणेकरून त्यांची ऐकून घेण्याची क्षमता विकसित होईल.
१४. एकदा का मुलांना प्रॉब्लेम कळला की, त्यांना उपाय शोधण्यासाठी विचार करता येईल. यासाठी ते ब्रेनस्ट्रॉर्म करतील. हे लगेच होत नाही पण मुलांना संधी दिली की, त्यांना स्वतःचे प्रश्न सोडवता येतील. मग आपण असहाय्य आहोत, आपल्याकडे समोरच्याशी सामना करण्याची ताकद नाही ही अधिकारहीनतेची भावना त्यांच्यातून कमी होईल.
१५. आपली चूक झाली असेल तर माफी कशी मागावी?. चूक कबूल कशी करावी? हे मुलांना शिकवा. जेव्हा मुलं चुकतात तेव्हा ती चूक मान्य कशी करायची यासाठी मुलांना मदत करा. म्हणजे नंतर भांडणादरम्यान होणारा वाद-विवाद टाळता येईल. एकदा का चूक कळली, ती मान्य करता आली तर तमाशे होत नाहीत.
मुलांना त्यांच्या चुकांची जबाबदारी घ्यायला शिकवली की आक्रमकता, मारामाऱ्या या टाळता येतील आणि मुलांना भांडणाचे मूळ कारण कळेल.
आपली चूक कबूल करण्याचे महत्त्व मुलांना शिकवण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे क्षमा मागणे, ‘सॉरी’ म्हणणे हाच आहे.
पालकांनो मुलांना सांगा की,
“Brothers and Sisters are like sugar and spice, they may fight but they always make life sweet.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -