Friday, May 9, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यबेस्ट उपक्रमाची व्यथा

बेस्ट उपक्रमाची व्यथा

मुंबई डॉट कॉम – अल्पेश म्हात्रे

मुंबईची दुसरी लाईफ लाईन समजली जाणाऱ्या बेस्टला आज गरज फक्त पैशांची नसून मानसिक आधाराची सुद्धा आहे. कोणे एकेकाळी सुवर्ण काळ अनुभवलेल्या बेस्टची आज अवस्था जीर्ण झाली आहे. नवीन कर्मचाऱ्यांची भरती नाही, आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण, खासगीकरणाचा प्रचंड रेटा त्यात वातावरणही बिघडलेले. येणाऱ्या ३० तारखेला पगार होईल की नाही याची शाश्वती नाही त्यामुळे भविष्यही अंधकारमय अशीच अशा स्थितीत बेस्ट कर्मचारी आला दिवस ढकलायचे काम करत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून एक कामाचा पॉझिटिव्हनेस दिसत नाही. नियमित कर्मचाऱ्यांचीही व अधिकाऱ्यांचीही ढकलगाडी सुरू आहे मग असे कर्मचारी व अधिकारी आउटपूट तरी काय देणार?

उपचार हाच मूलभूत अधिकार

आज बेस्टही मोठ्या आर्थिक समस्यांनाच नव्हे, तर इतर अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यात बेस्टच्या कर्मचाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, त्यामुळे असलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. एकीकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्याच निवृत्ती वेतनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागत आहेत न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच त्यांची देणी मिळत आहेत त्यामुळे त्यांच्या भविष्यातील आर्थिक बाबी यावर मर्यादा येत आहेत सध्या बेस्टमध्ये खासगीकरणाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत.

कंत्राटदाराच्या बस गाड्या दर आठवड्याला ताफ्यात समाविष्ट होत आहेत. त्यातून स्वतःच्या बस गाड्या ताफ्याबाहेर गेल्याने मोठ्या प्रमाणावर बस चालक रिक्त होत आहेत मग त्यांना बसून तरी राहावे लागत आहे किंवा आगारातील अथवा इतर कामे करावी लागत आहेत. त्यात बस चालवण्याशिवाय इतर कोणत्याही गोष्ट येत नसल्याने इतर कामे अंगवळणी पडण्यास वेळ लागत आहे. त्यात बस चालकांनी बस वाहकाची कामे करावीत असा फतवा बेस्टने काढल्यामुळे मान्यताप्राप्त बेस्ट कामगार संघटना न्यायालयात जाऊन अशा बेस्टच्या बेकायदेशीर कृतीवर स्थगिती आणली आहे. त्यामुळे एकतर आगारात त्यांना बसावे लागते किंवा इतर गोष्टी कराव्या लागत आहेत. त्यामुळे नैराश्याचे प्रमाण कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच बस वाहकांना मात्र स्वेच्छा निवृत्ती घेता येत नाही कारण आजही बस वाहकाचे काम हे बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडूनच करून घेतले जात आहे व भविष्यातही काही प्रमाणात करून घेतले जाणार त्यामुळे बस वाहकांची गरज पडत असल्याने बसवाहकांना आजही साधी सुट्टी मिळण्यात ही अनंत अडचणी येत आहेत.

चालू आर्थिक वर्षात बेस्टचा एकूण खर्च ४ हजार ५१८.३४ करोड आहे तर बस प्रवाशांकडून मिळणारे उत्पन्न हे २ हजार १६०.११ करोड रुपये अंदाजित केले आहेत. म्हणजे एकूण उत्पन्नाच्या फक्त ४७ ते ४८ टक्केच बेस्टला उत्पन्न मिळत आहे. ही उत्पन्नातील तफावत पालिकेने भरून द्यावे अशी बेस्टची अपेक्षा आहे. मात्र पालिका ती रक्कम एक रकमी ना देता १०० किंवा १०० च्या हप्त्यात देते त्यामुळे बेस्टवर खूप मर्यादा येत आहेत. आज बेस्टवरील कर्जाचा डोंगर दहा हजार ते बारा हजार करोडच्यावर गेलेला आहे त्यामुळे जर एक रकमी निदान तीन ते चार हजारांची रक्कम बेस्टला मिळाली, तर बेस्टवरचा बोजा खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. निवृत्ती वेतनांची देणे दिली जाऊ शकतात तसेच इतरही देणे दिली तर बेस्टला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो मात्र काही कारणांसाठी घेतलेले कर्ज व त्यावर देण्यात येणाऱ्या व्याजावरच पालिकेने दिलेली आर्थिक मदत ही संपून जाते त्यामुळे पुन्हा काही महिन्यानंतर बेस्ट समोर आर्थिक समस्या आ वासून उभी राहते. त्यात सध्या बेस्टला कायमस्वरूपी महाव्यवस्थापकही मिळत नाही. मिळतात ते फक्त तात्पुरते मलमपट्टी करणारे त्यामुळे आजही बेस्टमध्ये आत्मियतेने काम करणारा महाव्यवस्थापक आवश्यक आहे. एकीकडे मुंबईत असंख्य मोठमोठे प्रकल्प आणले जात आहेत त्यात पॉड टॅक्सी असो जलवाहतूक असो मेट्रो असो त्यासाठी केंद्र व राज्य सरकार मोठमोठी रक्कम उपलब्ध करून देत आहे, मात्र बेस्टकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर होत नाही ना? का इतर महागड्या पर्याय निर्माण करून सर्वसामान्यांचा स्वस्त्यातील प्रवास तर हिरावून घेतला जाणार नाही ना अशी शंकाही वारंवार प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे.

सध्या बेस्टकडे स्वतःचे ६ हजार ३३७ बस चालक व ७ हजार ७२४ बस वाहक आहेत. तर कंत्राट दाराकडे ५ हजार ५०० बस चालक व २ हजार २०० बस वाहक आहेत. मात्र कायमस्वरूपी बसचालकांना मिळणारे वेतन व कंत्राटदारांकडील बसचालक व वाहकांना मिळणारे वेतन यामध्ये खूप मोठी तफावत आहे. ती तातडीने दूर करणे खूप गरज आहे यासाठी कंत्राटदार यांनी नुसते फायद्याकडेच लक्ष न देता कर्मचाऱ्यांकडेही लक्ष दिले पाहिजे तरच आहे तो कामगार टिकून राहील नाहीतर मुंबईत बेस्ट बसला चालक मिळणे ही खूप कठीण गोष्ट असल्याचे आता दिसून येत आहे. आज बाजारात कुशल बस चालकांची संख्या कमी व मागणी जास्त आहे त्यामुळे जर आहे तो कर्मचारी टिकवला नाही तर मात्र कंत्राटदार नक्कीच संकटात सापडतील आणि यात भरडला जाईल तो बस प्रवासीच हे तितके खरे आहे.
क्रमशः

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -