Friday, May 9, 2025
Homeसाप्ताहिककोलाजसंस्कृतीचे संचित : भारतीय लोकनृत्य

संस्कृतीचे संचित : भारतीय लोकनृत्य

लता गुठे

भारतीय नृत्यांमध्ये शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य असे दोन प्रकार अति प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. जशी प्रांतानुसार भाषा बदलते, संस्कृती बदलते. प्रत्येक समूहाच्या संस्कृतीमध्ये काही प्रमाणात बदल आढळतो तो बदल त्या संस्कृतीची ओळख होऊन जाते. भारतातील लोकनृत्य ही प्रत्येक प्रदेशाच्या सांस्कृतिक परंपरेचा आरसा आहे असे मी म्हणेन. लोकनृत्य मुख्यतः उत्सव, सण, सोहळे, शेतीशी संबंधित कार्ये आणि धार्मिक विधींमध्ये सादर केली जातात. लोकनृत्याच्या विविधतेतून भारतीय समाजाचा आनंद, उत्साह परावर्तित होत असतो. लोकनृत्य ही समूहाशी निगडीत असतात. त्यांची पारंपरिक वेशभूषा करून समूहाने लोकनृत्य सादर करतात तेव्हा संपूर्ण समूहाचा आनंद उत्साह त्या नृत्यातून व्यक्त होत असतो. अगदी आदि मानवापासून लोकनृत्याची परंपरा चालत आलेली आहे. या लोकनृत्यातून आदिमानव आपला भावनाविष्कार करीत असे. मानवी संस्कृतीच्या प्रारंभ काळात या नृत्यामधूनच गीत रूप हळूहळू उत्क्रांत होत गेले. शब्द संगीत नृत्य हे तीन घटक एकवटून बनलेली संघटना म्हणजे लोकनृत्य होय.

वाद्य संगीत आणि गाणी या सर्वांचा परिणाम नृत्यावर होतो. गाण्यांच्या बोलाप्रमाणे वाद्यातून जेव्हा सूर उमटतात तेव्हा अंगांमध्ये आपोआपच ताल निर्माण होतो. अति प्राचीन काळापासून ते आजपर्यंत लोकनृत्याची कला जतन झाली आहे. भारतातील विविध प्रांतांमध्ये ज्या संस्कृती आहेत त्यांचे लोकनृत्य प्रसिद्ध आहेत. यामध्ये गुजरात येथील ‘गरबा’ दांडिया हे लोकनृत्य प्रसिद्ध आहे, तसेच पंजाबमधील भांगडा हे लोकनृत्य शेतीच्या कामानंतरचा श्रमपरिहार करण्यासाठी भांगडानृत्य सादर करतात. तसेच वेगवेगळ्या सण उत्साहाच्या प्रसंगीही भांगडानृत्य सादर केले जाते. लावणी व विविध प्रांतातील लोकनृत्य प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये कोकणातील तारपा, वेगवेगळ्या भागातील आदिवासी नृत्यही प्रसिद्ध आहेत. तसेच लावणी, गोंधळ ही महाराष्ट्रातील पारंपरिक नृत्य असून, यामध्ये स्त्रिया आकर्षक पारंपरिक पोषाख परिधान करून लावणीनृत्य सादर करतात. राजस्थानमध्ये ‘घुमर’ हे पारंपरिक नृत्य महिला सादर करतात. ‘छाऊ’ हे पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशातील प्रसिद्ध लोकनृत्य आहे. हे नृत्य मुखवटे आणि शस्त्रास्त्रांच्या साहाय्याने सादर केले जाते. ‘बिहू’ हे आसाम राज्यातील सर्वात प्रसिद्ध नृत्य आहे. हे मुख्यतः वसंत ऋतूच्या आगमनाच्या आनंदासाठी सादर केले जाते.
भारतीय नृत्यकला आधुनिक काळातही लोकप्रिय आहे. शास्त्रीय नृत्ये आता जागतिक स्तरावर पोहोचली आहेत. अनेक नृत्यसंस्था आणि कलाकार भारतीय नृत्यशैलींचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत.

लोकनृत्य सांस्कृतिक वारसा जपण्याचे माध्यम आहे. त्यातून समाजाची ओळख आणि परंपरा व्यक्त होते. त्या त्या समुहाचे लोक एकत्र येऊन लोकनृत्य सादर करतात. त्यातून करमणूक, तर होतेच त्याबरोबर आनंदही मिळतो आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीचा वारसाही जतन होतो. गीत, संगीत तसेच ढोल, ताशा, ढोलक, नगाडा, ढोलकी, सारंगी, हार्मोनियम आणि पारंपरिक वाद्यांचा समावेश लोकनृत्यांत होतो. प्रत्येक लोकनृत्यात समाजाची सांस्कृतिक ओळख दर्शवणारे पोशाख परिधान केले जातात. त्यावर पारंपरिक दागिने घालतात. नृत्य ही एक ६४ कलांपैकी एक कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात आजही प्रचलित आहेत. यापैकी काही प्रसिद्ध लोकनृत्याची नावे अशी आहेत… भांगडा, बांध, डफ, धामण, गिद्धा, नागुल, चक्री, घुमर, गणगोर, झुलन लीला, झुमा, घपाळ, कालबेलिया, सुइसिनी, भरतनाट्यम, कवडी, कोलत्तम, कुमी, चपली, कजरी, ढोरा, जैता, नौटंकी, रासलीला असे विविध‌ भागातील ही लोकनृत्य ही अतिशय लवचिक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. “भारतीय नृत्यकला ही केवळ शरीराची हालचाल नसून, ती आत्म्याची अभिव्यक्ती आहे!” असे म्हटले जाते, ते अगदी खरे आहे. वाद्याच्या तालावर पावले थिरकायला लागतात तेव्हा त्या व्यक्ती काया, वाचा, मनाने पूर्णपणे एकरूप होऊ लागतात. त्यातून साकार होते लोकनृत्य.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -