Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सफोन अ फ्रेंड (फोनमित्र)

फोन अ फ्रेंड (फोनमित्र)

फिरता फिरता – मेघना साने

फोन अ फ्रेंड’ हे कसे होतात हे मी नक्की सांगू शकत नाही. कारण या बाबतीतला प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. माझ्या एका मैत्रिणीला एक राँग नंबर लागला आणि तो माणूस चक्क एका नाटकाचा दिग्दर्शक निघाला. प्रसिद्धच होता. ती मैत्रीणदेखील लेखिका होती. तिने त्याच्या नाटकावर टिप्पणी करायला सुरुवात केली. तिचे निरीक्षण त्याला आवडले. त्यांचे नेहमीच एकमेकांना फोन जात असत. दोन तीन वर्षांनी त्याच्या नवीन नाटकांच्या शुभारंभाच्या त्याने तिला बोलाविले तेव्हा त्याची भेट झाली. तोवर ते एकमेकांचे ‘फोन अ फ्रेंड’ होते.

आता माझा अनुभव मी सांगते. परदेशातील मराठी शाळा यावर माहिती गोळा करताना मी शिकागोमधील सुलक्षणा नावाच्या एका मराठी शाळेच्या शिक्षिकेचा नंबर शोधून काढला. तिच्याशी संवाद केल्यावर माझ्या भाषेवरून आणि बोलण्यावरून तिला माझ्या कामाचे महत्व पटले. मग तिने माहिती द्यायला सुरुवात केली. शाळेची मुले, त्यांच्या इयत्ता, अभ्यासक्रम, त्यांचे उपक्रम इत्यादी माहिती मला मिळत गेली. तिने मला मुलांच्या कार्यक्रमांचे फोटोही पाठवले होते. तिच्याशी जरा जास्त मैत्री झाली होती. दोन वर्षांनी अमेरिकेला शिकागो येथे जाण्याचा योग आला. तर माझ्या या ‘फोन अ फ्रेंड’ने, सुलक्षणाने माझ्या घरीच उतरा आणि पुढील संशोधन करा असा आग्रह केला. मी शिकागो विमानतळावर उतरल्यावर ‘मी बाहेर तुम्हाला न्यायला आलेली आहे, गाडीत आहे’ असा निरोप व्हॉट्सअॅपवर आला. तेव्हा माझ्या लक्षात आले की मी तिला आजवर पाहिलेलेच नाही. ओळखणार तरी कसे? डीपीमधे देखील तिने शाळेच्या मुलांचे फोटो लावून ठेवले होते.

आमचे आजवर जे काम चालले होते त्यासाठी आमच्या चेहेऱ्यांची ओळख होण्याची गरजच नव्हती. आता मात्र प्रश्न आला होता. मग व्हीडिओ कॉल करून मी तिची नवीन ओळख करून घेतली. खरंच, दोन व्यक्तींची मैत्री होण्यासाठी चेहेऱ्यांची ओळख व्हायलाच हवी असे नाही. विचारांचीही मैत्री होऊ शकते.

आज परदेशातील अनेक लोकांशी माझी फोनवरून मैत्री झाली आहे. ऑस्ट्रेलियातील एका मैत्रिणीने आमच्याकडे शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम होणार आहे, बघायला या असे आमंत्रण दिले. तेव्हा चक्क मी ऑस्ट्रेलियात जाऊन तिच्या घरी राहिले. तेथील भव्य शिवजयंती महोत्सवावर एपिसोडदेखील बनवला. ऑस्ट्रेलियातील ज्यांची ज्यांची फोनवरून मुलाखत घेतली होती ते सर्वच तिथे भेटले. ‘परदेशात मराठी भाषेचा गौरव’ या विषयाने मी भारून गेले होते. गेले दोन वर्षे केवळ फोनवरून संवाद सुरू असलेल्या या ऑस्ट्रेलियातील मैत्रिणीकडे मी आठवडाभर राहिले आणि आम्ही एकत्र काम केले.

न्यू जर्सीमधील स्नेहल वझे हिच्याशी दोन वर्षे माझा केवळ फोनवरून संवाद सुरू होता. तो तेथील महाराष्ट्र मंडळाचे म्हणजे विश्व मराठीचे उपक्रम जाणून घेण्यासाठी. अनेक उपक्रमांची तिने माहिती दिली आणि कौतुकाने त्यावर मी लिहिले देखील. २०२३ मध्ये मला न्यू जर्सी येथे जाण्याचा योग आला. मी आणि माझे पती हेमंत साने न्यू जर्सी येथे नातलगांकडे उतरणार आहोत, असे मी तिला कळवले.

“ येताच आहात तर आमच्या होम थिएटरमधे कार्यक्रम पण करा.” आम्ही हो म्हटले. त्यांनी आमंत्रणेही केली.
प्रत्यक्षात आम्ही आम्ही न्यू जर्सीमध्ये उतरलो त्यादिवशी त्यांना फोन केला. तेव्हा स्नेहल वझे आणि तिचे पती दोघेही कोविडने आजारी होते. मला खूप वाईट वाटले. माझ्या फोन फ्रेंडची भेट आता होणार नाही, असे वाटले.

आम्ही दुसऱ्या शहरांमध्ये कार्यक्रम करून पंधरा दिवसांनी पुन्हा न्यू जर्सीला आलो. तोवर स्नेहल वझे बरी झाली होती आणि तिने ठरवलेले कार्यक्रम पार पाडायचे ठरवले होते. ५०, ६० पाहुण्यांना बोलावून त्यांच्यासमोर रीतसर आमचा कार्यक्रम तिने आखला होता. मला न पाहिलेल्या या फोन फ्रेंडने आमचा कार्यक्रम किती विश्वासाने पार पाडला.आहेकी नाही गंमत?
आणखीन एक गंमत झाली, ती ‘विश्व मराठी संमेलनात. स्वित्झर्लंडच्या महाराष्ट्र मंडळातील अध्यक्षांची, मी फोनवरून मुलाखत घेतली होती. मग तेथील भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल बऱ्याच गप्पा झाल्या. ‘कधी तरी कार्यक्रम करायला इकडे या’ असेही आमंत्रण मिळाले. पुण्याला होणाऱ्या २०२५च्या ‘विश्व मराठी संमेलना’त परदेशातील मराठी मंडळांचे कार्यकर्ते येणार आहेत हे मला कळल्यावर मी तेथे जाऊन धडकले. काही कार्यकर्ते भेटलेदेखील. पण स्वित्झर्लंडच्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षांची भेट काही झाली नाही. चौकशी केली तेव्हा कळलं की ते माझ्या शेजारून नुकतेच बाहेर निघून गेले होते. मी त्यांना ओळखले नाही आणि त्यांनी मला ओळखले नाही. कारण आम्ही होतो फक्त ‘फोन अ फ्रेंड’!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -