Home महामुंबई शिर्डीला पायी जाणाऱ्या टिटवाळ्यातील साई भक्तांवर काळाचा घाला

शिर्डीला पायी जाणाऱ्या टिटवाळ्यातील साई भक्तांवर काळाचा घाला

शिर्डीला पायी जाणाऱ्या टिटवाळ्यातील साई भक्तांवर काळाचा घाला

तिघांचा रस्ते अपघातात मृत्यू

कल्याण : टिटवाळा येथून गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने शिर्डीकडे पायी निघालेल्या साई आश्रय सेवा मंडळ (मांडा कोळीवाडा) पालखी सोहळ्यातील साई भक्तांना चारचाकी गाडीने सिन्नरनजीक धडक दिल्याने, झालेल्या अपघातात टिटवाळ्यातील तीन साई भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे मांडा टिटवाळा परिसरात शोककळा पसरली आहे.

शनिवारी टिटवाळ्यातून शिर्डीकडे पायी जाण्यासाठी, साई आश्रय सेवा मंडळाच्या पालखीने प्रस्थान केले. मंगळवारी रात्री ८च्या सुमारास सिन्नर येथील एसएमबीटी रूग्णालयानजीकच्या रस्त्यावरून पालखी जात असता, पायी चालणाऱ्या साईभक्तांना चारचाकी गाडीने धडक दिल्याने, या अपघातात साई भक्त भावेश राम पाटील, रवींद्र सुरेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर साईराज भोईरसह सलमान हे साईभक्त गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेले.

परंतु बुधवारी साईराज भोईर याला देखील मृत्यूने कवटाळले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून, गाडी चालकाचा तपास करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. रवींद्र व भावेश हे चुलत भाऊ आहेत. रवींद्रचे लग्न झाले असून, त्याला पत्नी व दोन लहान मुली आहेत. रिक्षा चालवून रवींद्र आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटना घडून १६ तासांपेक्षा अधिक कालावधी उठून गेला. मात्र अद्याप पोलिसांनी संबंधित वाहकाचा थांगपत्ता लागला नाही. त्याच्यावर कोणतेही कारवाई केली नाही, असा आरोप रवींद्र व भावेश यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.