पालघर : वसईचे रहिवासी असलेल्या पिता-पुत्राने पश्चिम रेल्वेच्या भाईंदर रेल्वे स्थानकामधील लोकल ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली.
मंगळवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकाच्या प्लेटफॉर्म क्रं. ६ वर ही घटना घडली आहे. हरिश मेहता (६०), जय मेहता (३५) अशी आत्महत्या केलेल्या दोघा पिता-पुत्रांची नावे आहेत.
विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनखाली उडी मारुन दोघांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच भाईंदर रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. परिणामी या प्रकरणी वसई रोड जीआरपीने आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे.