मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी
पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस (Mumbai rain) पडत होता. मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) मुंबईचे जनजीवन विस्कळीत केले. आता हळूहळू रेल्वेसेवा पूर्ववत होऊ लागली आहे. मात्र, अशातच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुसळधार पाऊस आणि रस्त्यांतील खड्ड्यांनी एका चिमुकल्याचा बळी घेतला आहे. पालघरमध्ये रस्त्यातील खड्ड्यात एक दुचाकी आदळली. त्यामुळे दुचाकीवरील महिलेच्या हातातील दीड वर्षांचे बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकाच वेळी सर्वत्र हळहळ तर प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर-नवापूर रोडवर ही घटना घडली. आई-वडिलांसोबत हा चिमुकला बाजारपेठेत जात असताना पावसाचे पाणी साचून तुडुंब भरलेल्या खड्ड्यात बाईक आदळल्याने हा अपघात घडला. खड्ड्यात पडताच आईच्या हातातून बाळ निसटले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. माहीर मोशीन शिवानी असं या चिमुकल्याचं नाव आहे.
या घटनेमुळे पालघरमध्ये संतप्त वातावरण आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले होते. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बोईसरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं.
मुसळधार पावसामुळे आज सकाळीच एक महिला धावत्या ट्रेनमधून पडल्याचे वृत्त समोर आले होते. या महिलेचा जीव वाचला परंतु तिचे दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले. पावसाच्या हाहाकाराने झालेल्या या दोन घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.