Home ताज्या घडामोडी चौथ्या टप्प्यातील निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

चौथ्या टप्प्यातील निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

चौथ्या टप्प्यातील निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघांत सोमवार, दि. १३ मे रोजी मतदान होणार असल्याने या मतदारसंघांतील प्रचार तोफा अखेर शनिवारी संध्याकाळी थंडावल्या. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील काही मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे.

या चौथ्या टप्प्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी नंदुरबार हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी, तर शिर्डी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रचार सभा घेतलेल्या नंदूरबारमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांच्या विरोधात काँग्रेसचे गोवाल पाडवी हे मैदानात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनीही शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात प्रचारसभांना संबोधित केले. या मतदारसंघात एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, महायुतीचे संदिपान भुमरे व महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यात मुख्य लढत आहे. अहमदनगरमधील भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात लढत आहे. जळगाव येथे भाजपच्या स्मिता वाघ आणि शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात तर रावेर येथे भाजपच्या रक्षा खडसे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत आहे. शिर्डीत शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांच्यात तिरंगी लढत आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे व शिरूर या मतदारसंघांतही प्रचार थंडावणार आहे. मावळ येथे शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील यांच्यात लढत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. शिरूर येथे दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने असून अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार व शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे रिंगणात आहेत.

लोकसभा निवडणुकीचा आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महायुतीचे उमेदवार संदीपान भूमरे व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची रॅली क्रांती चौकात एकमेकांसमोर आली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खोके, गद्दाराच्या घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देशी दारूच्या बाटल्या उंचावत भिंगरी-भिंगरी घोषणा दिल्या. त्यावेळी महायुतीच्या राजेंद्र जंजाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा विजय असो, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. दोन्ही बाजुंच्या गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही बाजुचे कार्यकर्ते शांत झाले.