मुंबई : राज्याबाहेरून आलेल्या परप्रांतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात नाल्यांवर बांधलेल्या झोपड्या, केलेली अतिक्रमणे आणि मतांसाठी त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी यामुळेच मुंबईतील नाले पावसाळ्यात तुंबत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
प्रत्येक संकटात लोकांच्या मदतीला मनसे धावते, मात्र मतदान पिळवणूक करणाऱ्यांनाच होते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मनसेच्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाच्या मेळाव्याला राज यांनी मार्गदर्शन केले. पक्षाची स्थापना करताना इतर पक्षांनी जे केले नाही ते आपल्याकडे असले पाहिजे, म्हणूनच नवनिर्माण हा शब्द वापरला. आणि त्यामुळेच पक्षाच्या वेगवेगळया शाखा तसेच आपत्कालीन व्यवस्थापन पथक स्थापन केले, असे प्रारंभीच स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मुंबईतील अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कोणत्या परिस्थितीत काम करत असतात आपण पाहिले पाहिजे. पण त्यांचे ज्या प्रमाणात कौतुक व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.