Home महामुंबई शिवडी रुग्णालयातील टीबी रुग्णांना मिळणार मांसाहारी जेवण

शिवडी रुग्णालयातील टीबी रुग्णांना मिळणार मांसाहारी जेवण

शिवडी रुग्णालयातील टीबी रुग्णांना मिळणार मांसाहारी जेवण

मुंबई (प्रतिनिधी) : शिवडी येथील पालिकेच्या टीबी रुग्णालयातील रुग्णांना मांसाहारी जेवण देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामुळे टीबीग्रस्त रुग्णांना सकस आहार मिळेल आणि प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वास रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

शिवडी येथे मुंबई महापालिकेचे ७५० खाटांचे क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयात सद्यस्थितीत ४५० रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येते. मात्र टीबी रुग्णालयातील रुग्णांसाठी जेवण तयार करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते; परंतु आवश्यक पोषण, प्रथिने, लसूण आणि आले हे पदार्थ जेवणात नसल्याचे निदर्शनास आले. रुग्णांच्या जेवणात, आहारात मांसाहाराचा समावेश करावा, अशा मागण्या माजी नगरसेवकांनी केल्या होत्या. त्यानंतर मांसाहारी जेवणाचा समावेश करण्यासाठी तसा प्रस्ताव पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाकडे पाठवण्यात आला होता. सीपीडीकडे हा प्रस्ताव गेल्यावर याबाबत कमी दर असलेल्या कंत्राटदाराला हे कंत्राट देण्यात येणार आहे. झालेल्या बैठकीत रुग्णांना मांसाहार सुरू करण्याबाबत सहमती दर्शवण्यात आली आहे. सीपीडीकडून प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून १५-२० दिवसांत निविदा काढण्यात येईल, असे मध्यवर्ती खरेदी विभागाकडून सांगण्यात आले. मांसाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहारात चार चपात्या, भात, डाळ, उसळ (सर्व रुग्णांसाठी आठवड्यातून दोनदा) ६० ग्रॅम चिकन असलेली चिकन करी यांचा समावेश असेल. शाकाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहार, पनीर देण्यात येणार आहे.