देशात गुरुवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. कारण या दिवशी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षनाट्याची सुनावणी संपणार होती. तसेच निवडणूक आयोगाबाबतचाही निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार होते. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा, तसेच मेघालय, त्रिपुरा आणि नागालॅण्ड या ईशान्य भारतातील राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. त्यापैकी कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा म्हणजेच काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. गेल्या २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या कसब्याच्या या गडाला धंगेकरांनी सुरुंग लावला आहे, तर पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी बाजी मारली असून त्यांनी मविआच्या नाना काटे यांना पराभूत केले आहे. येथे तिरंगी लढतीचा भाजपच्या जगताप यांना चांगलाच फायदा झाल्याचे दिसले. कसब्यात पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या २१व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली.
दुसऱ्या-तिसऱ्या फेरीचा अपवाद वगळता प्रत्येक फेरीत धंगेकर हे रासनेंना वरचढ ठरले. अगदी शनिवार पेठ, सदाशिव पेठ आणि नारायण पेठ हा जो भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा त्या भागांतही जनतेने धंगेकरांना साथ दिलेली दिसली. अपेक्षेप्रमाणे रविवार-शुक्रवार पेठ तसेच लोहियानगर आणि मोमिनपुरा भागातून रवींद्र धंगेकर यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन त्यांना भरघोस मतदान केले. सरतेशेवटी रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना ११ हजार मतांनी पराभवाची धूळ चारत विधानसभेत पाऊल ठेवले आहे. पुण्यातील १०० पेक्षा जास्त माजी नगरसेवक व स्थानिक पदाधिकाऱ्यांची फौज हेमंत रासने यांच्यासाठी कामाला लागली होती. पण धंगेकरांचा झंझावात पाहता त्यांचा टिकाव लागत नसल्याचे लक्षात आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाच ते सहा मंत्री हे कसब्यात चक्क तळ ठोकून होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील शेवटचे सहा दिवस कसब्यातच होते. इतकेच काय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसब्यात घर घेऊन ते प्रत्येक अपडेटवर जातीने लक्ष ठेवून होते, तर मविआच्या रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठीही राज्यातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र धंगेकरांच्या भोवतीच निवडणूक राहील, याची पुरेपूर काळजी संबंधित नेत्यांनी घेतली. त्याचा परिपाक म्हणजे भाजपला ही निवडणूक मोदी-शहा विरुद्ध काँग्रेस अशी करण्याची संधीच मिळाली नाही. भपर्यायाने शेवटपर्यंत ही निवडणूक भाजप विरुद्ध रवींद्र धंगेकर अशीच राहिली. यापूर्वी दोन विधानसभा निवडणूक लढण्याचा अनुभव पाठीशी असलेल्या धंगेकर यांनी कसब्याच्या पश्चिम भागाबरोबरच पूर्व भागातदेखील लक्ष केंद्रित केले होते व घरोघरी जाऊन प्रचार केला व प्रचाराची ही पद्धत त्यांना फायदेशीर ठरली. त्या तुलनेत हेमंत रासने यांनी भाजपचे बलस्थान असलेल्या पूर्व भागात अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे पश्चिम भागातील मतदारांना आकर्षित करण्यात रासने हे अपयशी ठरल्याचे दिसते. शिवाय पूर्व भागावर संपूर्ण फोकस करूनही जनतेने रासने यांना साथ दिली असे दिसले नाही. प्रामुख्याने धंगेकर यांचा जनसंपर्क आणि कसब्यातील सामान्य नागरिकांमध्ये असलेली धंगेकर यांची क्रेझ अफाट होती. त्या तुलनेत रासने हे धंगेकरांच्या खूपच मागे होते. ब्राह्मण समाजाची नाराजी, अॅन्टीइन्कंबन्सीचा फटका, गिरीश बापटांची अनुपस्थिती या सगळ्यांमुळे भाजपला कसब्यात जोरदार फटका बसला हे निश्चित. रवींद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक मात्र राज ठाकरे यांनी पक्ष सोडल्यानंतर ते त्यांच्याबरोबर मनसेमध्ये डेरेदाखल झाले. नंतर रवींद्र धंगेकर हे नगरसेवकदेखील झाले. २००९ साली मनसेकडून त्यांना कसबा विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यावेळी त्यांनी गिरीश बापट यांच्याविरोधात दंड थोपटले. अवघ्या सात हजार मतांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांचा पराभव झाला होता. २०१४ मध्येदेखील धंगेकर यांनी मनसेकडूनच निवडणूक लढवली होती. दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून लढणाऱ्या धंगेकर यांना कसब्याच्या जनतेने साथ देत विधानसभेत पाठवले आहे.
इशान्येत पुन्हा कमळ फुलले…
ईशान्येकडील त्रिपुरा, नागालॅण्ड आणि मेघालय या तीन आकाराने छोट्या राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली आहे. त्रिपुरात भाजपने अपेक्षेप्रमाणे सत्ता राखली असली तरी त्यांना शेवटपर्यंत झुंज द्यावी लागली, तर नागालॅण्डमध्ये विरोधकच नव्हते. येथे एनडीपीपी आणि भाजप यांच्या युतीने मोठे यश मिळविले आहे, तर मेघालयमध्ये त्रिशंकू स्थिती असली तरी, कॉनराड संगमा यांचे एनपीपी पुन्हा सत्तेत येईल हे स्पष्ट आहे. मात्र ते भाजपला बरोबर घेणार की छोटे पक्ष किंवा यूडीपीशी सत्तेसाठी आघाडी करणार ते पाहणे औत्सुक्याचे आहे. नागालॅण्डमध्ये नॅशनलिस्ट डेमॉक्रेटिक पक्ष व भाजप यांच्या आघाडीला फारसा विरोध नव्हता. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल पीपल्स पक्षाला ६० जागी उमेदवारही मिळाले नाहीत. मुख्यमंत्री नैफीयो रिओ यांनी राज्यात शांतता प्रस्थापित केल्याने ते लोकप्रिय आहेत. ते आता चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा महिला विजयी झाल्या आहेत, हे निकालाचे एक वैशिष्ट्य. एनडीपीपीच्या हेकिना झलकू या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. याखेरीज रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने दोन जागा जिंकल्या आहेत हे आणखी विशेष. दहा वर्षांपूर्वी ईशान्येकडे जेमतेम अस्तित्व असलेल्या भाजपने आता घट्ट पाय रोवल्याचे या निकालाने अधोरेखित झाले आहे. तसेच आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही पहिली फेरी भाजपने जिंकली आहे, असेच म्हणावे लागेल.