कल्याण : गेल्या आठ वर्षापासून सोयी सुविधांची वानवा असलेल्या कल्याण पूर्वेच्या अडवली ढोकाळी भागातील आई एकविरा महिला मंडळाने निषेध आंदोलन करत केडीएमसी मुख्यालयावर धडक दिली. अनेक वर्षापासून मुख्य रस्त्यापासून अंतर्गत रस्ता खराब असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता १२ मार्च पर्यंत तत्काळ बनवून द्या अन्यथा १३ मार्च पासून पालिका मुख्यालया बाहेर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आई एकविरा मंडळाच्या सोनी क्षिरसागर यांनी दिला आहे.
कल्याण पूर्वेत समस्यांचा विळखा असून नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यातच अडीवली ढोकळी येथील श्री मलंगगड मुख्य रस्त्यापासून राजाराम पाटील नगर येथे जाणारा रस्ता, ऑस्टन नगर येथील रस्ता गेली आठ वर्ष खराब आहे. याच खराब, चिखलाच्या रस्त्यावरून लहानांपासून वृद्धांना पायपीट करावी लागते. असे असताना केडीएमसीचे आयुक्त, उपायुक्त तसेच संबधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देवून त्याचा पाठपुरावा देखील घेण्यात येत होता. मात्र पालिका प्रशासन कोणत्याही प्रकारची दाखल घेत नसल्याने आई एकविरा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांसह पालिका मुख्यालया समोर जाहीर निषेध आंदोलन पुकारण्यात आले.