Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणसावंतवाडीत पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी

सावंतवाडीत पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडीत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. दिवाळीचा सण असल्याने खरेदीसाठी फुललेल्या बाजारपेठेवर परतीच्या पावसामुळे विरजण पडले, तर नरक चतुदर्शीच्या पार्श्वभूमीवर शहरात बनवलेले नरकासुराचे देखावे मात्र भिजून गेले.

मंगळवारी सायंकाळी अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तसेच विक्रेत्यांची तारांबळ उडाली होती, तर त्यानंतर रात्रभर अधून मधून पावसाच्या रिमझिम सरी सुरूच होत्या. मात्र, या पावसाच्या सरीत भिजत नागरिक दिवाळी सणाच्या सामानांची खरेदी करताना दिसत होते, तर धनोत्रयोदशी असल्याने सोने खरेदीकडे नागरिकांचा जास्त कल दिसून येत होता. दरम्यान, बुधवारी सायंकाळी पुन्हा झालेल्या पावसाने मात्र दिवाळीचे सर्वच चित्र बदलून टाकले. गेल्या काही दिवसांत पडलेली थंडी देखील गायब झाली व प्रचंड उष्मा वाढला. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, तर दमट वातावरणात उष्णतादेखील जाणवत होती. त्यामुळे सायंकाळी पाऊस येणार याची सर्वांनाच खात्री होती.

त्याप्रमाणे सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल अर्धा तास पाऊस अक्षरशः झोडपत होता. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांना दुकान शेडचा आसरा घ्यावा लागला, तर छत्री, रेनकोट नसलेल्या नागरिकांनी अखेर भिजत जाण्यास पसंती दिली. मात्र, या पावसाचा मोठा परिणाम व्यापारी वर्गावर होण्याची शक्यता आहे.

फुललेले मार्केट ह्या पावसाने मात्र सुनेसुने करून टाकले. शहरात घराघरांत तसेच ग्रामीण भागात धनत्रयोदशी दिवशी करण्यात आलेली विद्युत रोषणाई तसेच कंदील भिजून गेले. ग्रामीण भागात तर भातशेतीचे देखील नुकसान झाले. असाच पाऊस पडत राहिल्यास तोंडाशी आलेला घास नासाडी होण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -