मुंबई : गेले नऊ महिने मुंबईत लसीकरण मोहीम सुरू असून ९७ टक्के नागरिकांना लसीचा एक डोस देण्यात आला आहे. येत्या दिवाळी पर्यंत मुंबईमधील १०० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस पूर्ण होईल. त्यानंतर पुढील वर्षी जानेवारी महिन्यात १०० टक्के नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण होतील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ३९ लाख २६ हजार ९६८ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ८७ लाख ६० लाख ६० लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ५१ लाख ६६ हजार ९०८ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
आतापर्यंत कोव्हीशिल्डचे १ कोटी २५ लाख ३४ हजार २६४, कोवॅक्सिंनचे १३ लाख ३९ हजार ३०२, स्फुटनिक व्हीचे ५३ हजार ४०२ डोस देण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.