Home देश Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

0
Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवणात लोखंडी बोल्ट आढळला. प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करत भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसीकडे तक्रार केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेच्या खानपान सेवेच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वड्याच्या शेजारी दिसला मोठा लोखंडी बोल्ट

समर्थ कोडियाल यांनी 28 नोव्हेंबर रोजी बंगळूरु ते बेळगावी प्रवासादरम्यान हा प्रकार अनुभवला. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जेवणातील वडा दोन तुकड्यांमध्ये तुटलेला दिसत असून, त्याच्या शेजारी मोठा धातूचा बोल्ट आढळतो. जेवणात अशा प्रकारची वस्तू सापडणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना टॅग करून जेवणाच्या गुणवत्तेतील त्रुटीकडे लक्ष वेधले.

IRCTCकडून माफी; सेवा पुरवठादारावर कारवाई

प्रवाशाच्या तक्रारीला उत्तर देताना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली. तसेच संबंधित खानपान सेवा पुरवठादारावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.

स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचे (SOP) काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्वयंपाकघरातील उपकरणांची तपासणी करण्याचे आणि अन्न तयार करण्यापूर्वी सर्व उपकरणे योग्य स्थितीत असल्याची खात्री करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

रेल्वेच्या खानपान सेवेच्या गुणवत्तेवर प्रश्न

वंदे भारत एक्सप्रेसमधील या घटनेमुळे रेल्वेच्या जेवणाच्या दर्जासोबतच अन्नसुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्वयंपाकघर आणि अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here