अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने मेडिकेअर या सरकारी आरोग्य विमा योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या निर्णयाचा फटका अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या सुमारे ३ लाख कायदेशीर स्थलांतरितांना बसण्याची शक्यता आहे. नव्या नियमांनुसार, काही विशिष्ट श्रेणीतील स्थलांतरितांना २०२७ पासून मेडिकेअरचा लाभ घेता येणार नाही. सोशल सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनने (SSA) यासंदर्भात संबंधित लाभार्थ्यांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे.
एका वृत्तानुसार, या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग स्थलांतरितांवर होणार आहे. विशेष म्हणजे, यातील अनेकांनी अमेरिकेत अनेक वर्षे काम केले असून नियमितपणे करही भरला आहे. मात्र, नव्या नियमांमुळे त्यांना सरकारी आरोग्य विम्यापासून वंचित राहावे लागू शकते.
कोणत्या स्थलांतरितांना बसणार फटका ?
या निर्णयामुळे शरणार्थी, अमेरिकेत आश्रय मिळालेले नागरिक, तात्पुरत्या संरक्षित दर्जाअंतर्गत (TPS) राहणारे स्थलांतरित आणि मानव तस्करीचे बळी ठरलेले लोक प्रभावित होऊ शकतात. हे लोक त्यांच्या कामाच्या नोंदीच्या आधारे मेडिकेअर योजनेचा लाभ घेत होते. यामध्ये गंभीर किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या काही रुग्णांचाही समावेश आहे. अशा रुग्णांना नियमित डायलिसिस उपचारांसाठी मेडिकेअर योजनेवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे विमा बंद झाल्यास त्यांच्या उपचारांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
https://www.prahaar.in/2026/11/29/russia-ukraine-war-russia-ukraine-war-flares-up-again-civilians-killed-on-one-side-drone-attacks-on-oil-facilities-on-the-other/
ट्रम्प यांच्या नव्या कायद्यात नेमका काय बदल ?
जुलै २०२५ मध्ये अमेरिकन संसदेत रिपब्लिकन खासदारांनी मंजूर केलेल्या H.R. 1 या कायद्याचा हा भाग आहे. ‘वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट’ (OBBBA) म्हणूनही हा कायदा ओळखला जातो. नव्या तरतुदीनुसार, मेडिकेअरचा लाभ प्रामुख्याने अमेरिकन नागरिक आणि स्थलांतरितांच्या काही निवडक श्रेणींपुरताच मर्यादित करण्यात आला आहे.
यामध्ये ग्रीन कार्डधारक, क्युबा आणि हैतीमधून आलेल्या काही विशिष्ट श्रेणीतील स्थलांतरितांसह विशेष आंतरराष्ट्रीय करारांनुसार अमेरिकेत राहणाऱ्या काही देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. सरकारच्या समर्थकांच्या मते, या बदलांमुळे सरकारी योजनांचा लाभ पात्र लोकांनाच मिळेल. मात्र, आरोग्य संघटना आणि स्थलांतरितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या निर्णयाला विरोध केला आहे. (Medicare Rules )
६ अब्ज डॉलरपेक्षा जास्त योगदान, तरीही…
या निर्णयातील महत्त्वाची बाब म्हणजे प्रभावित स्थलांतरितांनी अमेरिकेतील मेडिकेअर योजनेसाठी एकूण ६ अब्ज डॉलरपेक्षा जास्त योगदान दिल्याचे वृत्त आहे. काही स्थलांतरितांचे ग्रीन कार्ड मंजूर झाले असले, तरी सरकारी प्रक्रियेतील विलंबामुळे त्यांना अद्याप आवश्यक कागदपत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे अशा लोकांनाही विम्याचा लाभ गमावण्याची भीती आहे.
अपील करण्यासाठी मिळणार ३० दिवसांची मुदत
सोशल सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनने पाठवलेल्या नोटिसांमध्ये प्रभावित लाभार्थ्यांना निर्णयाविरोधात अपील करण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी संबंधित हेल्पलाइनवर संपर्क साधता येईल किंवा बदललेल्या इमिग्रेशन स्टेटसची कागदपत्रे सादर करता येतील. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, इतक्या कमी कालावधीत सर्व प्रभावित नागरिकांना अपील करणे शक्य होईल का, याबाबत आरोग्य संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील स्थलांतरितांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.